नगर : सोडत स्थगित; इच्छुकांचा तूर्त हिरमोड | पुढारी

नगर : सोडत स्थगित; इच्छुकांचा तूर्त हिरमोड

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यापासून झेडपी, पंचायत समिती गट-गण आरक्षणाचे इच्छुकांना डोहाळे लागले होते. त्यामुळे आज बुधवार दि. 13 रोजी काढल्या जाणार्‍या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, काल सर्वोच्च न्यायालयातील निर्णयाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तूर्त आरक्षण सोडतीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कार्यकाल संपण्यापुर्वी किमान महिनाभर निवडणूक प्रक्रिया सुरू व्हावी, अशी इच्छुकांची अपेक्षा होती. मात्र कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर कार्यकाल संपल्यानंतर तत्कालिन सदस्यांना मुदतवाढ मिळावी, यासाठीही प्रयत्न झाला. मात्र तेथेही यश आले नाही.

प्रशासकाच्या हाती झेडपी आणि पंचायत समितीचा कारभार देण्यात आला. त्यामुळे आयोगाने लवकरच निवडणूकीही प्रक्रिया सुरू करावी, यासाठी इच्छुकांची मागणी होती. मोठ्या प्रतीक्षेनंतर दुसर्‍यांदा गट-गणांची रचना झाली. त्यानंतर मतदार याद्याचाही कार्यक्रम लागला. आरक्षणही सोडतीचेही ठरले. त्यामुळे इच्छुकांनी आपल्या गट-गणांचे आडाखे बांधून तयारीही सुरू होती. मात्र, मंगळवारी झालेल्या ओबीसी आरक्षण सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ज्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहेत, तेथील निवडणुका घ्याव्यात, असे कळविताना इतर निवडणुका पुढे ढकलाव्यात, असे सुतोवाच केले. त्यामुळे या निर्णयाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने आज बुधवारी होणारी आरक्षण सोडत स्थगित केली आहे.

पुढील सुनावणी आठवड्यानंतर होणार आहे. आता पुढच्या सुनावणीतही आरक्षण सोडतीचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षण नक्की कधी निघणार या चिंतेने जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे दिसून येत आहे.

Back to top button