पिंपरी : औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा उपलब्ध | पुढारी

पिंपरी : औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी जागा उपलब्ध

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांमधून निर्माण होणार्‍या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी संयुक्तपणे औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा (सीईटीपी) उभारण्यात येणार आहे. त्याचा 15 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाणार आहे.

प्रकल्पासाठी एमआयडीसीकडून नुकतीच जागा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.12) दिली. महापालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकार्यांची बैठक आज झाली.

त्यात त्यांनी वरील माहिती दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, मराठा चेंबर्सचे पिंपरी-चिंचवड विभागाध्यक्ष दीपक करंदीकर, पारस कुलकर्णी, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबणीस, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता एम. एस. कलकुटकी, उपअभियंता पी. सी. जोशी, यांच्यासह सीईटीपी फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठा चेंबर्सतर्फे नियोजित सीईटीपी प्रकल्पाबद्दल सादरीकरण करण्यात आले. एमआयडीसीतील ‘टीफ ब्लॉक, प्लॉट क्रमांक 188’ या ठिकाणी तो प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी एमआयडीसीने नुकतीच जागा उपलब्ध करून दिली आहे. एमआयडीसीतील कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी कचरा संकलन व विलगीकरण केंद्र (एमआरएफ) उभारण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा चेंबर्सने तो प्रकल्प उभारणीसाठी आर्थिक सहाय्य करावे, अशी सूचना आयुक्त पाटील यांनी केली.

Back to top button