पुढारी ऑनलाईन डेस्क : 'प्लॅटून वन फिल्म्स'ने नुकतीच आपल्या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'तो, ती आणि फुजी' असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत. ललित प्रभाकर-मृण्मयी गोडबोले यांची लोकप्रिय जोडीने या आधी 'चि. व चि. सौ. का' या चित्रपटात बघायला मिळाली होती. हा चित्रपट तब्बल १०० दिवस सिनेमागृहात गर्दी खेचत होता. 'ती, तो आणि फुजी' या चित्रपटाकडूनदेखील याच अपेक्षा आहेत.
मराठी, हिंदी आणि उर्दू रंगभूमीवरील ख्यातनाम दिग्दर्शक असलेल्या मोहितने जून २०२२ मध्ये 'मीडियम स्पायसी' या चित्रपटाद्वारे आपलं मराठी दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. मोहित आपल्या 'तो, ती आणि फुजी' या नव्या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना, प्रेमाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा शोध घेणारा प्रवास म्हणतो.
तो पुढे म्हणतो की, "सध्याच्या गुंतागुंतीच्या शहरी जीवनात सहज, सुंदर आणि नैसर्गिक प्रेमाची जागा मोजूनमापून केलेल्या कृत्रिम प्रेमाने घेतली आहे. पण खरा प्रश्न तर हा आहे, की नेमकं प्रेम गुंतागुंतीचं आहे की प्रेमात पडणारी माणसं?
चित्रपटाची कथा एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या दोन पात्रांभोवती फिरते. पात्रांच्या वैयक्तिक आशा आकांक्षा, त्यांची वेगवेगळी जीवनमुल्यं आणि एकमेकांकडून असलेल्या अवाजवी अपेक्षा यांमुळे त्यांच्या नात्याचा कडवट शेवट होतो. पण पुन्हा सात वर्षांनी ही दोन पात्रं अनपेक्षितपणे एकमेकांसमोर येतात. त्यावेळी त्यांच्यासमोर असतात एकमेकांची वेगळ्या वाटेवरची आयुष्यं आणि त्यामुळे तयार झालेल्या नव्या अडचणी.
शिलादित्य बोरा आणि राकेश वारे ही जोडी 'तो, ती आणि फुजी' या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या वर्षाअखेरीस चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे.
'तो, ती आणि फुजी'च्या निर्मितीसाठी त्यांना तेलगू अभिनेते आणि निर्माते असलेल्या राकेश वारे ह्यांची साथ मिळाली आहे. 'तो, ती आणि फुजी'चं चित्रिकरण पुणे, कोलाड, टोकियो, क्योटो आणि माउंट फुजी इथे होणार आहे. दोन विभिन्न संस्कृती असणाऱ्या देशांचं सौंदर्य टिपण्यासाठी, या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी दोन वेगळे सिनेमॅटोग्राफर्स असणार आहेत.
प्लॅटून वन फिल्म्स' आणि 'क्रेझी अँट्स प्रॉडक्शन' निर्मित, 'तो, ती आणि फुजी' हा चित्रपट १७ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.