IND vs WI : क्लीन स्वीपचा इरादा | पुढारी

IND vs WI : क्लीन स्वीपचा इरादा

पोर्ट ऑफ स्पेन ; वृत्तसंस्था : शिखर धवनच्या (IND vs WI) नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून वन डे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना आज (बुधवारी) उभय संघात रंगणार आहे. हा सामना जिंकून कॅरेबियन भूमीवर क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा इरादा असणार आहे.

इंग्लंड दौरा संपल्यानंतर शिखरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला. परंतु या संघात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत असे मोठे खेळाडू नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत मालिका जिंकण्याचे आव्हान धवनपुढे होते. युवा शिलेदारांच्या जोरावर दिल्लीकर धवनने हे आव्हान पूर्ण करून मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले. विंडीजविरुद्ध सलग 12 मालिका जिंकण्याचा पराक्रमही भारताने यावेळी नोंदवला.

या दोन सामन्यांचा विचार करता दोन्ही सामने तीनशे पार मोठ्या धावसंख्येचे झाले. भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे दोन्ही विजयांत मिळून सर्वच खेळाडूंनी योगदान दिले. शिखरसह शुभमन गिल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा या आघाडीच्या फळीने चांगल्या धावा केल्या. फक्त फलंदाजीत सूर्यकुमार यादव दोन्ही डावांत स्वस्तात बाद झाला. पण यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागणार नाही. तिसर्‍या सामन्यात तो आपले अपयश मागे टाकण्याचा प्रयत्न करेल. दुसर्‍या सामन्यात तर आघाडी फळी विजय साकारण्यात कमी पडली असता अष्टपैलू अक्षर पटेलने आपणही मॅचविनर आहोत हे दाखवून दिले.

दुसरीकडे तीनशे पार धावा करूनही संघाला पराभव पत्करावा लागत असल्यामुळे यजमान संघाचा कर्णधार निकोलस पूरन याने निराशा व्यक्त केली आहे. आता तिसरा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहेत.

तिसरा वन डे सामना (IND vs WI)
स्थळ : पोर्ट ऑफ स्पेन
वेळ : संध्याकाळी 7 वा.
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्टस्

रोहित, ऋषभ वेस्ट इंडिजमध्ये दाखल

त्रिनिदाद : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वन डे मालिका जिंकली आहे आणि तिसरा वन डे सामना आज (बुधवारी) होणार आहे. त्यानंतर पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ती महत्त्वाची आहे. इंग्लंड दौर्‍यानंतर विश्रांतीवर गेलेला रोहित शर्मा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक हे पुन्हा मैदानावर दिसणार आहेत. रोहित, ऋषभसह ट्वेंटी-20 संघातील 7 खेळाडू मंगळवारी दाखल झाले. विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना या ट्वेंटी-20 मालिकेसाठी विश्रांती दिली गेली आहे. भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हर्षल पटेल, आर अश्विन व हार्दिक पांड्या हेही या ट्वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघाचे सदस्य आहेत.

Back to top button