बीसीसीआयने टायटल स्पॉन्सर बदलला; पेटीएमच्या जागी आता मास्टरकार्ड | पुढारी

बीसीसीआयने टायटल स्पॉन्सर बदलला; पेटीएमच्या जागी आता मास्टरकार्ड

मुंबई : डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने बीसीसीआयसोबतचा करार वेळेआधीच मोडला आहे. आता बीसीसीआयने टायटल स्पॉन्सर पेटीएमची जागा मास्टरकार्डने घेतली आहे. भारतात होणार्‍या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टायटल स्पॉन्सर फक्त मास्टरकार्ड असेल. बीसीसीआयने 2019 मध्ये पेटीएमसोबत टायटल प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते. त्यानंतर एका सामन्यासाठी 3.80 कोटी रुपयांचा सौदा निश्चित करण्यात आला. त्यापूर्वी ही रक्कम 2.4 कोटी रुपये होती. परंतु मध्येच पेटीएमने हा करार तोडला.

भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा संपवून झिम्बाब्वेला जाणार आहे. येथे टीम इंडिया 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. देशांतर्गत दौर्‍यावर मास्टरकार्डच शीर्षक प्रायोजक असेल. इनसाइड स्पोर्टस्च्या वृत्तानुसार, पेटीएमने जुलैच्या सुरुवातीला बीसीसीआयला सांगितले होते की, यापुढे त्यांच्या सामन्यांचे शीर्षक प्रायोजक म्हणून चालू ठेवू इच्छित नाहीत आणि त्यांनी मास्टरकार्डकडे अधिकार सोपवण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पेटीएमसोबत झालेल्या कराराच्या आधारे हे अधिकार मास्टरकार्डकडे हस्तांतरित केले.

आता मास्टरकार्ड बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी 3.8 कोटी रुपये देणार आहे. पेटीएमने यापूर्वी 2023 पर्यंत बीसीसीआयकडून हे हक्क विकत घेतले होते. मात्र आता ते वेगळे झाले असून आता 2023 पर्यंत हे अधिकार मास्टरकार्डकडे सुपूर्द केले जातील.

Back to top button