बेळगाव : युरिया टंचाई; कृषी खात्याचा साठा फक्‍त कागदावरच | पुढारी

बेळगाव : युरिया टंचाई; कृषी खात्याचा साठा फक्‍त कागदावरच

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची मागणी वाढली असताना साठा उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना युरिया खताच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अधिकार्‍यांकडून खताचा स्टॉक उपलब्ध असल्याचे सांंगण्यात येत आहे. पण तो स्टॉक केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात तो उपलब्ध होत नसल्याने कृषी खात्याच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या भात रोप लागवडीचा हंगाम जोरात सुरु आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढली आहे.तालुक्याच्या बहुतांश भागात भात रोप लागवड अंतिम टप्प्यात आहे. तर नदी काठावरील शेतकरी नदीला येणार्‍या पुरामुळे रोप वा़हून जाण्याची किंवा कुजण्याची भीती असल्याने याठिकाणी रोप लागवड विलंबाने करण्यात येते.

सध्या ओलिताखाली असलेल्या जमिनीत रोप लागवडीला जोर आहे. अनेक शेतकर्‍यांंनी 15 दिवसांपूर्वी भात रोप लागवड केली आहे. अशा शेतकर्‍यांना भाताच्या वाढीसाठी युरिया खताची गरज भासत आहे. या बरोबर बटाटा, सोयाबिन, रताळी, मका आदी पिकांच्या वाढीसाठी युरिया खाताची नितांत गरज आहे. पण तालुक्यातील विविध विक्रेत्यांकडे खताचा साठा नसल्याने शेतकर्‍यांना युरिया खताच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणी वाढल्याने विक्रेत्यांकडून युरियाची जादा दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना जादा दराने खताची खरेदी करावी लागत आहे. कृषी खात्याकडून साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी खात्याकडून सांगण्यात येणारा साठा केवळ कागदावरच आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या आकडेवारीवर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

युरिया खताचा साठा उपलब्ध आहे. आवश्यक ठिकाणी पुरवठा करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात येईल कमतरता भासू देणार नाही.
-एच. डी. कोेळेकर उपसंचालक, कृषी खाते.

युरिया ख़ताचा तुटवडा असून कृषी खात्याकडून प्र्रति बॅग 266 रुपये विक्री भाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात युरियाची 350 रु प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. कृषी खात्याचे नियंत्रण नसल्याने शेतकर्‍यांना जादा दराने युरियाची खरेदी करावी लागत आहे.
अप्पासाहेब देसाई, शेतकरी नेते

Back to top button