Latest

२५७ कोटींची रोकड बाळगणारा पियूष जैन वापरत होते साधी गाडी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : कानपूरचे अब्जाधीश अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या संपत्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून २५७ कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. पियूष जैन याला अटक करण्यात आली आहे. २६ डिसेंबर रोजी अटक केल्यानंतर जैन याची रात्र काकडेदेव पोलीस ठाण्यात गेली.

अटक करण्यापूर्वी जैन याची ५० तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. रविवारी त्यांच्या कन्नौज येथील वडिलोपार्जित निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या इतर अनेक ठिकाणी छापे अजूनही सुरू आहेत. पियूष जैन याच्याजवळ कोट्यवधींची संपत्ती असुनही तो साधी कार वापरत होता.

तपास यंत्रणांना आतापर्यंत जैनच्या घरातील रोख आणि दागिन्यांसह १६ मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. अहवालानुसार, जैन यांच्याकडे कन्नौजमध्ये ७, कानपूरमध्ये ४, मुंबईत २ आणि दिल्लीत एक मालमत्ता आहे. दुबईतही त्याने दोन मालमत्ता खरेदी केल्या आहेत.

पियूष जैन साध्या गाड्या वापरत होता

अमाप संपत्तीचा मालक पीयूष जैन लोकांच्या आणि तपास यंत्रणांच्या नजरेत येऊ नये म्हणून अत्यंत साधेपणाने राहत होता. जैन दोन जुन्या गाड्या वापरत होता. यातील एका गाडीचा विमाही संपला आहे. एवढेच नाही तर जैन घराच्या संरक्षणासाठी ठेवलेले चौकीदारही एक ते दीड वर्षात बदलत होता. त्याचा व्यवसाय कोणाला माहित होऊ नये म्हणून त्याने घरी नोकरही ठेवले नव्हते.

पियूष जैनला टॅक्स चुकवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कानपूरमधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)चे सह आयुक्त सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, बनावट पावत्यांद्वारे करचोरी केली जात होती. दरम्यान, परफ्यूम असोसिएशनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. जैन हे परफ्यूमचे व्यापारी नसल्याचे असोसिएशनने आपल्या पत्रात म्हटले आहे. जैन यांच्या कारवायांचा अत्तराच्या व्यवसायाशी संबंध नसून एजन्सींनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जावे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यापूर्वी २२ डिसेंबरला तपास यंत्रणांनी पियूष जैनच्या घरावर छापे टाकण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी जैन हे वडिलांच्या उपचारानिमित्त दिल्लीत होते. एजन्सींनी बोलावल्यानंतर जैन यांना दिल्लीहून कानपूर गाठावे लागले होते.

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT