कोरोनाने पती गमावलेल्या महिलांना गिरगावच्या राजाचा आधार! | पुढारी

कोरोनाने पती गमावलेल्या महिलांना गिरगावच्या राजाचा आधार!

मुंबई, राजेश सावंत : कोरोनाने मुंबईतील अनेक कुटुंब उद्‍ध्वस्त केली आहेत. कुणाचा पती, कुणाचे आई- वडील तर, कुणाची मुले कोरोनाने हिरावून घेतली. गिरगाव येथील मुरकुटे कुटुंबातील दोन कर्तबगार बंधू व त्यांच्या मातोश्रींचे दीड वर्षापूर्वी कोरोनाने निधन झाले. त्यामुळे कधीही घराच्या बाहेर न पडलेल्या दोन्ही सुनांवर कुटुंबाची जबाबदारी पडली. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विचारात त्‍या असतानाच गिरगावचा राजा या दोन्ही महिलांचा आधार बनला आहे. आधार या संस्थेमार्फत आता त्यांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी तसेच मदतीचा धनादेश देण्यात आला.

हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये कोरोनांचा शिरकाव झाला आणि होत्याचे नव्हते झालं. कुटुंबाची जबाबदारी असलेला घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्यानंतर त्या घरातील कुटुंबाची काय अवस्था झाली असेल? दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, कुटुंबाची जबाबदारी कशी पार पडायची, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. यातूनही काही लोक स्वतःला सावरत, दुःख बाजूला ठेवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ती नोकरी करून, अर्धवट राहिलेल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.

गिरगाव येथील सुखी समृद्ध आणि समाधानी मुरकुटे कुटुंबातीळ तीन जणांचा कोरोना लाटेत बळी गेला. ५० दिवसांच्या कालावधीत घरातील दोन कर्तबगार बंधू व त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. कुटुंबप्रमुखांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरातील दोन कर्ते पुरुष व आई कोरोनाने हिरावून घेतल्यामुळे मुरकुटे कुटुंबाचे खूपच हाल होत होते.

कुटुंबाच्या या अस्तित्वाच्या लढाईची धुरा दोन्ही बंधूंच्या पत्नी रेश्मा गिरीश मुरकुटे व रिया राजेश मुरकुटे यांनी आपल्या हाती घेतली. स्वतःवर कोसळलेले दुःख बाजूला ठेवून त्या दोघी परिस्थितीला सामोरे गेल्या. दियान व विराज या दोन मुलांच्या भवितव्याचा विचार करून, संसाराचा गाडा खेचण्याचा प्रामाणिक प्रयत्न दोघींनी समर्थपणे पेलला.

त्या दोघी कुठेतरी नोकरी किंवा व्यवसायात स्थिर होईपर्यंत, कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी घरातच स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने गिरगावचा राजाच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या “आधार” संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या घरी घरघंटी तसेच मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी आधारचे सचिव नितीन शिरोडकर, दिलीप नाईक, किशोर भाटकर, श्रीकांत तेंडोलकर, अशोक मंत्री, महेश मंत्रवादी, कमलेश राणे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button