forest of Chandrapur : देशात प्रथमच चंद्रपुरातील प्रादेशिक वनांत पर्यटन सफारीला प्रारंभ | पुढारी

forest of Chandrapur : देशात प्रथमच चंद्रपुरातील प्रादेशिक वनांत पर्यटन सफारीला प्रारंभ

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : सध्या देशभरातील वेगवेगळ्या राज्यात वनविभागाच्या संरक्षितवनांत उभारण्यात आलेल्या व्याघ्र अभयारण्य व पर्यटनासारख्या प्रकल्पातून नागरिकांना पर्यटनाचा आनंद उपभोगता येत आहे. मात्र एखाद्या राज्यात किंवा आपल्या देशात प्रादेशिक वनविभागाच्या वनांत पर्यटन सफारीची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. (forest of Chandrapur)

पण वनविभाग व संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारवा यांच्या सहभागातुन चंद्रपुरातील बल्लारशाह वनपरिक्षेत्रात कारवा येथे देशातील प्रथमच प्रादेशिक वनक्षेत्रात पर्यटकांसाठी सफारी पर्यटनाला २५ डिसेंबर २०२१ पासुन सुरुवात झाली आहे. प्रादेशिक वनविभागात सुरु झालेले हे देशातील पहिले सफारी पर्यटन आहे.

forest of Chandrapur : नागरिकांना रोजगाराच्या संधी

सदर पर्यटनाच्या माध्यामातून जनतेच्या मनात वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी व लोकसहभागातून वनव्यवस्थापन करणे शक्य व्हावे या हेतुने सफारी पर्यटनाची मुहुर्तमेढ चंद्रपुरातील जंगलात रोवण्यात आलेली आहे.

मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येत असलेले कारवा हे आदिवासी बहुल गाव असुन जंगलाच्या कुशीत वसलेले आहे. येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारवा यांच्या सहभागातुन कारवा जंगलात पर्यटन सफारीसाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. येथील नागरिकांना

रोजगाराच्या संधी या सफारी पर्यटनामूळे मिळणार आहे.

विशेष म्हणजे या पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना गाईड म्हणून येथील काही महिला व पुरुषांना प्रशिक्षीत करण्यात आले असून तेच या ठिकाणी पर्यटकांना पर्यटनाचे धडे देणार आहेत. आदर्श जंगलाची संकल्पना कारवा जंगलात पहायला मिळणार आहे. रस्त्याच्याकडेला फळांचे झाडे, वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणवठे, मचान, सौर ऊर्जेवरील विद्युत व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

व्याघ्र अभयारण्य असो कि अन्य वन प्रकल्प त्याठिकाणी फक्त वाघांना बघण्याचा विचारच प्रत्येक पर्यटकाच्या मनात असतो. परंतु बल्लारशाह वनपरिक्षेत्रांतर्गत कारवाच्या जंगलात संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि वनविभागाच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या आदर्श वनात वाघांसोबतच बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण, चितळ, सांबर, निलगाय, चौसिंगा, रानकुत्रे, २०० प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुलपाखरे पर्यटकांना पहायला मिळणार आहेत.

गावकऱ्यांच्या सक्रिय लोकसहभागातून वन-वन्यजीव व्यवस्थापन, मानव-वन्यजीव सहजीवन प्रस्थापीत करणे, वनांचे शाश्वत जतन करुन येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सुमारे ५० कि. मी. चे जुने बैलगाडी आणि कूप रस्त्यांचा वापर करुन पर्यटन रस्ते तयार करण्यात आलेले आहे.

सफारी पर्यटनाकरीता रस्त्यांचे जाळे कक्ष क्र. ५००, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ५१३, ५१५, ५११, ५१०, ५०९, ४९९ मार्गी परत कारवा रोपवाटीका पर्यंत निर्माण करण्यात आलेला आहे.

ऑनलाईन बुकिंगचीही सोय

कारवा सफारी पर्यटनाला २५ डिसेंबर २०२१ पासून प्रारंभ करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर SUV खासगी वाहने यांना प्रवेश देण्यात येणार आहे. अगदी माफक दरात क्षेत्राचे प्रवेश शुल्क ६०० रुपये आणि गार्डन शुल्क ४०० रुपये असणार आहे. स्थानिक गाईड यांना प्रशिक्षी त करण्यात आलेले असुन भविष्यात सदर पर्यटन सफारीची ऑनलाईन बुकींग www.mytadoba.org या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

सफारी पर्यटन क्षेत्रात ई – सहीलंस चे कॅमेरे बसबिले असुन त्याव्दारे पर्यटकांवर, सफारी पर्यटनाच्या घडामोडीवर व वन्यजीव हालचालींवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत मिळत आहे. या पर्यटन सफारीकरीता स. ६.०० ते १०.०० पर्यंत ०८ वाहने , दु. २.०० ते ६.०० वाजेपर्यंत ०८ वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

Back to top button