नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महारोगराईमुळे अर्थव्यवस्थेवर कोसळलेल्या संकटातून अद्यापही देश सावरला नसल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याने औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्ही क्षेत्रातून तब्बल १५ लाखांहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्याची (Jobless) धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (एसएमआयई) अहवालातून नोकरदार लोकांची जुलैमध्ये असलेली ३९९.३८ दशलक्ष संख्या ऑगस्टमध्ये ३९७.७८ दशलक्ष नोंदवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात केवळ ग्रामीण भागातच जवळपास १३ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या.
'सीएमआयई'नुसार राष्ट्रीय बेरोजगारी दर जुलैमध्ये ६.९५ टक्क्यांवरून ८.३२ टक्क्यांवर पोहोचला.
जुनमध्ये हा दर १०.०७ टक्के, मे मध्ये १४.७३ टक्के आणि एप्रिलमध्ये ९.७८ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात मार्च महिन्यात कोरोना महारोगराईची दुसरी लाट येण्यापूर्वी शहरातील बेरोजगारीचा (Jobless) दर जवळपास ७.२७ टक्के होता, असा दावा देखील अहवालातून करण्यात आला आहे.
कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अनेक कंपन्या बंद झाल्या. कंपन्या बंद झाल्याने नोकरीचा बाजार संकुचित झाला आणि लोकांना रोजगार मिळणे कठीण झाल्याचे यावरून दिसून आले आहे.
ग्रामीण बेरोजगारी ऑगस्टमध्ये १.३ टक्क्यांनी वाढून ७.६४ टक्क्यांवर पोहोचली, हे प्रमाण जुलैमध्ये ६.३४ टक्के होत.
मुख्यतः खरीप हंगामात कमी पेरणीमुळे रोजगाराचा दर कमी होत असताना, ऑगस्टमध्ये श्रमशक्तीच्या सहभागीतेचे प्रमाण किरकोळ वाढल्याचे दिसून येत असल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे.
भारतात मागील दोन वर्षांपासून नोकरी संबंधी अवघड वातावरण निर्माण झाले आहे.
आर्थिक घडी हळूहळू पुर्वपदावर येत असली तरी, नोकरी बाजारात संघर्ष सुरू असल्याचे यावरून अधोरेखित झाले आहे.