नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: माजी राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांचे गुरुवारी रात्री वयाच्या६५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप नेते स्वपन दासगुप्ता, काँग्रेसचे शशी थरुर आदी मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली आहे.
राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून मित्रा यांनी 2003 ते 2009 या कालावधीत काम केले होते तर 2010 ते 2016 या कालावधीत भाजपतर्फे ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर गेले होते.
मित्रा यांच्या निधनाने पत्रकारिता जगताची मोठी हानी झाली असल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
बुध्दीमत्ता आणि तीक्ष्ण नजर यासाठी मित्रा यासाठी मित्रा यांना सदैव ओळखले जाईल. केवळ पत्रकारिताच नव्हे तर राजकारणाच्या क्षेत्रातही त्यांनी आपली ओळख बनविली होती. त्यांच्या निधनाचे दुःख अतीव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मित्रा हे दिल्लीतील दैनिक पायोनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते.
2018 साली त्यांनी भाजपला रामराम करुन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणार्या मित्रा यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात कोलकाता येथे दैनिक स्टेटसमनमधून केली होती. त्यानंतर दिल्लीत त्यांनी टाईम्स ऑफ इंडिया, दि संडे ऑर्ब्झरव्हर, हिंदुस्थान टाईम्स आणि दैनिक पायोनियरमध्ये काम केले.
हेही वाचलं का ?