Latest

Jhimma movie : पुन्हा कुटुंबासोबत चित्रपटगृहात रंगणार आनंदाचा खेळ

स्वालिया न. शिकलगार

असे म्हणतात, 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो…' त्याची स्वतःशीच नव्याने ओळख होते. आयुष्य मनमुराद जगण्यासाठीची ही शिकवण देणाऱ्या झिम्मा (Jhimma movie) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. झिम्मा (Jhimma movie) चित्रपटाची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तेव्हापासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमी, आवडीनिवडी, वयोगट असलेल्या अनोळखी स्त्रिया जेव्हा सहलीच्या निमित्ताने एकत्र येतात तेव्हा होणारी धमाल म्हणजे 'झिम्मा'. या वेगळ्या स्वभावाच्या महिला प्रवाशांची जेव्हा 'इंग्लंड टूर' सुरु होते तेव्हा त्यांच्यात घडणारी मज्जामस्ती, खटके, एकमेकींविषयीची काळजी, वेळोवेळी दिलेले मानसिक धैर्य, नव्याने निर्माण झालेली नाती असा सुंदर प्रवास 'झिम्मा'मध्ये पाहायला मिळणार आहेत.

'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर हसतखेळवत बरंच काही सांगून जातो. आयुष्य जगण्यातली मजा आपण आपल्याही नकळत हरवून बसतो, हे या चित्रपटात अधोरेखित करण्यात आले आहे.

'चूल आणि मूल' या संकल्पनेखाली वावरणाऱ्या स्त्रिया जेव्हा मोकळ्या आकाशाखाली स्वछंदी आयुष्य जगतात. तेव्हा त्यांची स्वतःशीच एक नवीन ओळख होते, त्यामुळे प्रत्येक महिलेने पाहावा, असा हा चित्रपट आहे. महिलांनीच नाही तर प्रत्येकाने आवर्जून पाहावा, असा हा धमाल कौटुंबिक चित्रपट आहे.

दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतात, " लॉकडाऊनच्या बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहे प्रेक्षकांसाठी खुली होत आहेत. चित्रपटगृहात जाणे आता पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रेक्षकांच्या मनातील कोरोनाची भीती निघून जावी आणि त्यांनी चित्रपट चित्रपटगृहातच येऊन पाहावा. यासाठीच आम्ही चित्रपटाचा ट्रेलर प्रिव्ह्यू थिएटरमध्ये प्रदर्शित करत आहोत.

दिग्दर्शक म्हणून इंग्लंडमध्ये चित्रित होणारा हा माझा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक आहे. वेगवेगळ्या वयोगटातील या नायिका अभिनयात अव्वल आहेत. यात अनेक कलाकार असल्याने आम्ही सर्वांनीच चित्रीकरणादरम्यान भरपूर धमाल केली.

ऑफस्क्रीन केलेली ही धमाल तुम्हाला ऑनस्क्रीन बघायला मिळेल. विषयही वेगळा आहे. यात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा उलगडा हा चित्रपट पाहिल्यावरच होईल.

हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग, स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह निर्मित हा चित्रपट १९ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT