Latest

Jalgaon : गोद्री कुंभासाठी पाचशे एकरात साकारली सात नगरे, चार राज्यांचे मुख्यमंत्री येणार

गणेश सोनवणे

जळगाव : गोद्री (ता. जामनेर) येथे २६ ते ३० जानेवारीदरम्यान पाचशे एकर क्षेत्रात अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ होत आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. देशभरातील संत-महंत, चार राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रिगण या कुंभाला उपस्थित राहणार आहेत. रोज लाखभर भाविक कुंभात येतील, असा अंदाज असून, त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगरांची निर्मिती करण्यात आली आहे.

त्यामध्ये पन्नास हजार भाविकांची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभरात कुंभमेळ्यात येणाऱ्या दीड लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. भोजन तयार करण्यासाठी सात मोठी स्वयंपाकघरे उभारण्यात आली आहेत.

चोवीस तास अन्नछत्र

गोद्री येथील कुंभमेळ्यात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी २४ तास अन्नछत्रात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभस्थळी मुख्य सभामंडपाच्या समोरील बाजूसही भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. त्यात रोज दीड लाखापेक्षा अधिक भाविक भोजन करतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

चार हेलिपॅडची उभारणी

सहादिवसीय कुंभासाठी देशभरातून विविध राष्ट्रीय संत, राजकीय नेते, मंत्री तसेच विशेष पाहुणे येणार आहेत. येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्या सोयीसाठी चार हेलिपॅडची उभारणी करण्यात येत आहे.

महिला भाविकांसाठी स्वतंत्र नगर

कुंभासाठी दहा लाख भाविक तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतून येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी सात नगरांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी एक स्वतंत्र नगर महिलांसाठी असणार आहे. तसेच अडीच ते तीन हजार महिलांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या नगरात मंडपात निवास व्यवस्थेसह स्नानगृहे साकरण्यात येत आहेत. त्यात पिण्याच्या पाण्यासह अत्याधुनिक पद्धतीच्या शौचालयांचीही उभारणी करण्यात आली आहे.

नव्वद संत कुटिया

अडीचशे एकरच्या मंडपातील गोद्री कुंभात सहा डोम व नव्वद संत कुटिया उभारण्याचे काम सुरू आहे. त्यात मुख्य सभागृहाचा डोम जर्मन हँगर उज्जैन येथून आणला आहे. कुंभात सभा मंडपाचा डोम हा मुख्य डोम असणार आहे. याठिकाणी विशेष मान्यवर येणार असल्याने त्यादृष्टीने त्यांची उभारणी करण्यात आली आहे.

गोंद्री येथील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी बचत गटाच्या स्टॉलला जागा देण्यात आली आहे. त्यात २०० बचतगट आपल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन लावणार आहे. धार्मिकस्थळी मंदिराच्या मागच्या बाजूला केंद्रीय कार्यालय असणार आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अमृतसर, नांदेड येथील गुरुद्वाराच्या माध्यमातून भाविकांसाठी प्रसादाचे लंगर लावण्यात येणार आहे.

दोन हजार पोलिसांचा ताफा

कुंभात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता याठिकाणी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निशामक दल, रुग्णवाहिका, रुग्णालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मोबाईल कनेटिव्हिटीसाठी 'बीएसएनएल'कडून तात्पुरत्या स्वरूपाच्या मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT