पालघर : ऐतिहासिक शिरगाव कोट किल्ल्यावर शेकडो वर्षांनी तोफगाडा विराजमान

पालघर : पुढारी वृत्तसेवा : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक शिरगाव कोट किल्ल्यावर रविवारी तोफगाडा दुर्गार्पण सोहळा संपन्न झाला. स्वराज प्रतिष्ठान शिरगाव व स्वराज्यकार्य टीम कोहोज यांच्या संयुक्त विद्यमाने २८५ व्या ऐतिहासिक शिरगाव कोट विजय दिनानिमित्त समस्त शिरगाव ग्रामस्थ व दुर्गमित्रांच्या साक्षीने शिरगाव किल्ल्यावर विविध उपक्रमांनी मानवंदना देण्यात आली. स्वराज प्रतिष्ठान शिरगाव व स्वराज्यकार्य टीम कोहोज यांनी लोकसहभागातून व लोकमदत निधीतून शिरगाव किल्ल्यावर गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेली तोफ पुन्हा नव्या मजबूत सागवानी तोफगाड्यावर विराजमान केली. सकाळी या उपक्रमाची सुरुवात राजा शिवछत्रपतींच्या पालखी मानवंदना मिरवणुकीने करण्यात आली.
मराठमोळ्या पद्धतीने तयार केलेल्या तोफगाड्याचे प्रथम पूजन राजन कृष्णा पाटील व सौ. मिलिंदा राजन पाटील कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वास्तुदेवता पूजन, जेजुरी भंडारा पूजन, स्थानदेवता पूजन, श्री. गणेश पूजन, तोफगाडा पूजन, शस्त्र पूजन, समुद्र देवता पूजन करण्यात आले. दुर्गमित्रांनी बुरुजांचा परिसरात भगवी तोरणे, आंब्याची पाने, झेंडूची फुले इत्यादींनी सजविण्यात आला होता. महाराष्ट्र प्रांतातील अनेक गडकोटांवर सध्या दुर्गसंवर्धन मोहिमेचा एक भाग म्हणून तोफांचे संवर्धन सुरू आहे. त्यात अनेक ठिकाणी तोफगाडे बसविण्यात आलेले आहे. शिरगाव किल्ल्यावरील तोफखान्याचे विशेष म्हणजे, मराठमोळ्या पध्दतीने तयार करण्यात आलेला तोफगाडा. वसई गिरिझमधील प्रसिद्ध कलाकार सिक्वेरा बंधूनी सदर काम पूर्ण केले.
शिरगाव भागातील कलाकार अक्षय किणी यांनी सदर तोफगाड्याचे अभ्यासपूर्ण रेखाटन तयार केले आहे. सकाळी ११ वाजता स्वराज प्रतिष्ठान शिरगाव अंतर्गत युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, किल्ले वसई मोहिम परिवार, स्वराज्यकार्य टीम कोहोज, स्थानिक मान्यवर ग्रामस्थ, सातपाटी पोलीस प्रतिनिधी, संवर्धन मोहिम केळवे इत्यादी मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले. किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख व इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी शिरगाव किल्ल्याचा १८ व्या शतकातील इतिहास, वसईची मोहीम घडामोडी, वीर मराठ्यांचा पराक्रम, किल्ल्यातील वास्तू, तोफ संवर्धनाची आवश्यकता, आगामी संवर्धन मोहिमा इत्यादी विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या सर्वोत्तम सहकार्याने सदर उपक्रम पूर्ण झाल्याचे सुंदर चित्र आज शिरगाव किल्ल्यावर दिसत होते.
प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुष वर्ग यांनी सदर तोफगाड्याचे दर्शन घेत पूजन नमन केले. स्वराज प्रतिष्ठान शिरगाव अंतर्गत पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून किल्ल्यातील सर्व वास्तूंवर वास्तुविशेष नावे फलक लावण्यात आलेले आहेत. दुर्गसंवर्धनात तत्पर असणारे दुर्गमित्र अक्षय किणी, निखिल मोरे, योगेश मोरे, शुभम पाटील, अक्षय पाटील, परेश गावड, तुषार पाटील, कौशल्य राऊत, आदित्यनाथ शिंगरे, राज्य पुरातत्व विभाग मुंबई यांच्या सक्रिय सहभागाने सदर उपक्रम यशस्वी झाला. दिवसभरात मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू, वसई, भाईंदर भागातून आलेल्या विविध दुर्गमित्रांनी, इतिहासप्रेमींनी सदर सोहळ्यास प्रत्यक्षात भेट दिली.
हेही वाचलंत का?
- ‘मविआ’ सरकारनेही केले होते देशी कंपन्यांशी करार
- पुणे : सड्यावरील जीवसृष्टीबद्दल अनास्था; डॉ. अपर्णा वाटवे यांचे प्रतिपादन
- पुणे : सड्यावरील जीवसृष्टीबद्दल अनास्था; डॉ. अपर्णा वाटवे यांचे प्रतिपादन