कोल्हापूर : मुरगूडच्या अंबाबाई मंदिराच्या वास्तूशांती सोहळ्यास विधीवत पूजेने प्रारंभ | पुढारी

कोल्हापूर : मुरगूडच्या अंबाबाई मंदिराच्या वास्तूशांती सोहळ्यास विधीवत पूजेने प्रारंभ

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तूशांती विधी सोहळ्यास आज (दि.२४) पहिल्या दिवशी मुहूर्तमेढने सुरुवात करण्यात आली. सकाळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते मुहूर्तमेढ आणून ती अंबाबाई मंदिराजवळ लावण्यात आली. त्यांच्या पत्नीही यावेळी उपस्थित होत्या. त्यानंतर मातंग समाज आणि खटांगळे समाज यांच्यातर्फे अंबाबाई मंदिरास तोरण बांधण्यात आले. यानंतर विधिवत स्वरूपात अंबाबाई मंदिराचे वास्तुशांत समारंभास सुरुवात करण्यात आली.

यावेळी देवदेवतांना विडे, संकल्प, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण, ऋत्विकवरण, प्रासाद शुद्धी (उदक), अग्निस्थापना, देवताधान्यादिवास, राक्षोघ्नहवन इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. तसेच मुरगुड येथील आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचे गुरुपूजन देखील करण्यात आले. येथील जाधव गल्ली, खंडागळे गल्ली, कुंभार गल्ली, मगदूम गल्ली, राम मंदिर परिसर, मेंडके नगर, भारमल नगर, संत कबीर गल्ली, शेणवी गल्ली, काळभैरव गल्ली, रावण गल्ली, चांगले गल्ली या मंदिर परिसरातील गारवा आज मंदिरास आणण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी गारव्याचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांसह भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

         हेही वाचलंत का ?

Back to top button