Latest

Chandrayaan-3 launch | ‘इस्रो’ने इतिहास रचला! ‘चांद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण

दीपक दि. भांदिगरे

श्रीहरिकोटा : पुढारी ऑनलाईन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने आज शुक्रवारी (दि.१४) इतिहास रचला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून (Satish Dhawan Space Center in Sriharikota) शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता 'चांद्रयान-३'चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी लाँच व्हेईकलपासून सॅटेलाईट यशस्वीपणे वेगळे केल्याची घोषणा केली. चांद्रयान-३ चा चंद्रावर प्रवास सुरू करण्यासाठी त्याला इच्छित कक्षेत ठेवण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. "चांद्रयान-३ ने त्याच्या अचूक कक्षेत चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. अंतराळ यान सुस्थितीत आहे," असे इस्रोने म्हटले आहे.
प्रकल्प संचालक पी वीरमुथुवेल आणि इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी LVM3 M4 यान यशस्वीरित्या कक्षेत प्रक्षेपित केल्यावर आनंद व्यक्त केला.

'चांद्रयान-३' (Chandrayaan-3) ला अद्ययावत बाहुबली रॉकेट म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क-४ (एलव्ही एम-4) द्वारे झेपावले आणि इतिहासाच्या पानावर भारताने एक नवा अध्याय लिहिला. या लाँचरच्या यशाचा दर आजवर १०० टक्के आहे. तब्बल सहा मोहिमा या लाँचरने फत्ते केल्या आहेत. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर चांद्रयान-३ लँडर विक्रम ४० दिवसांच्या प्रवासानंतर २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरेल. (Chandrayaan-3 launch)

chandrayaan 3 live video चांद्रयान ३ प्रक्षेपण यावर पाहा

मानवाला पडलेले कोडे उलगडणार

चंद्रावरील पाणी, चंद्रावरील खनिजे, पृथ्वीची निर्मिती संशोधनासाठी असे अनेक विषय घेऊन ही प्रयोगशाळा चंद्राकडे झेपावली आहे. महत्त्वाचे म्हणजे अन्य कुठल्या ग्रहावर, उपग्रहावर, तार्‍यावर पृथ्वीप्रमाणे जीवन आहे काय, हे मानवाला असलेले कोडे उलगडण्याच्या दिशेनेही चांद्रयान-३ ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (chandrayaan-3 countdown)

पुढचे १४ दिवस रोव्हर (प्रज्ञान) हे लँडरच्या चोहीकडे आणि ३६० अंशात फिरत राहील. अनेक चाचण्या करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर उमटणार्‍या रोव्हरच्या पाऊलखुणांची छायाचित्रेही लँडरकडून पाठविली जातील. रोव्हर चंद्राच्या ज्या भागावर फिरणार आहे, तेथे आधीही चांद्रयान-१ मोहिमेंतर्गत भारताने मून इम्पॅक्ट प्रोब उतरविले होते आणि त्याच्याच मदतीने चंद्रावर पाणी असल्याचा शोध 'इस्रोने' (भारताने) लावला होता. येथेच चांद्रयान-२ चे क्रॅश लँडिंगही झाले होते. म्हणजेच उतरताना लँडर कोसळले होते. एक गोड आणि एक कडू अनुभव या भागाने 'इस्रो'ला या आधी दिलेला आहे. शुक्रवारच्या या तिसर्‍या प्रसंगाकडून भारतालाच नव्हे, तर जगालाही खूप अपेक्षा आहेत.

चंद्रावरची भारताची तिसरी मोहीम

चांद्रयान-३ ही चंद्रावरची भारताची तिसरी मोहीम आहे. या मोहिमेच्या सुमारे चार लाख किलोमीटरच्या प्रवासात ३,९२१ किलो वजनाचा उपग्रह सोडण्यात येत आहे. हे अपग्रेडेड 'बाहुबली' रॉकेट, ज्याला आता लॉन्च व्हेईकल मार्क ३ (LM-3) असे नाव देण्यात आले आहे. त्याचे वजन ६४२ टन आहे, जे सुमारे १३० पूर्ण वाढ झालेल्या आशियाई हत्तींच्या एकत्रित वजनाएवढे आहे. हे ४३.५ मीटर उंच विशाल रॉकेट आहे, जे ७२ मीटर उंच असलेल्या कुतूब मिनारच्या निम्म्याहून अधिक उंचीचे आहे.

ही आहेत तीन आव्हाने

  • लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग
  • चंद्राच्या पृष्ठभागावरून रोव्हर चालविणे
  • चंद्रावरील विविध घटकांचे वैज्ञानिक परीक्षण

एलव्हीएम ३ बद्दल…

  • यान नेणारे एलव्हीएम ३ रॉकेट हे देशाचे सर्वात अवजड रॉकेट
  • वजन ६४० टन, लांबी ४३.५ मीटर
  • चांद्रयानाचे एकूण पेलोड जवळपास ३ टन

चांद्रयान-3 चे महत्त्व काय?

  • चंद्राच्या अशा भागात लँडर उतरणार आहे, ज्याची काहीही माहिती आजवर उपलब्ध नाही.
  • चंद्रावरील सोने, प्लॅटिनियम, युरेनियम आदी खनिज संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे.
  • अंतराळात चीनला प्रतिआव्हान देणे, या द़ृष्टिनेही ही मोहीम महत्त्वाची आहे.

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर

  • ३.८४ लाख कि.मी. आहे. ते पार करायला ४५ ते ४८ दिवस यानाला लागतील.
  • एलएमव्ही ३ ने यान पृथ्वीच्या कक्षेत पाठवल्यानंतर ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल आणि याबरोबरच आपल्या प्रदक्षिणेचा परिघ वाढवत राहील.
  • आणि यादरम्यान एका क्षणी ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राला प्रदक्षिणा घालणे सुरू करेल. लँडर आपला परीघ लहान करत करत एका क्षणी चंद्रावर लँडिंग करेल.


हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT