पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल हमास यांच्यात गेले १० दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. शनिवारी(दि.७) हमासने इस्रायलवर रॉकेट डागले आणि युद्धाला सुरूवात झाली. इस्रायलने देखील हमासला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान या घटनेचे जगभरात पडसाद उमटत आहेत. तर जगभरातील ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अमेरिकेत देखील अशीच घटना घडली आहे. ७१ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने ६ वर्षीय मुस्लिम मुलावर २६ वेळा चाकूने वार करत त्याची हत्या केली. दरम्यान या मुलाच्या आईवर देखील आरोपींने वार केले आहेत. (Israel-Hamas war)
इस्रायल-हमास युद्धादरम्यान अमेरिकेतील शिकागो येथे ही हिंसक घटना घडली आहे. रविवारी (दि.१५) ७१ वर्षीय जोसेफ जुबा या वृद्धाने वाडिया अल-फ्यूम (Wadea Al-Fayoume) या ६ वर्षीय मुलांवर चाकूने २६ वार केले. तर याचवेळी त्याच्या ३२ वर्षीय आईवरही चाकूने हल्ला करण्यात आला. या घटनेत सहा वर्षांच्या पॅलेस्टिनी-अमेरिकन निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. तर आई गंभीर जखमी झाली आहे. (Israel-Hamas war)
हवाई हल्ल्यानंतर आता इस्रायल सैन्य जमिनीवरील युद्धासाठी सज्ज असून, हमास या आंतकवादी संघटना आणि म्होरक्यांना नष्ट करण्याचे इस्रायलचे उद्दिष्ट आहे, असे इस्रायली डिफेन्स फोर्सने यापूर्वी स्पष्ट केले होते. दरम्यान अमेरिकेतील शिकागो येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी इलिनॉय (शिकागो) येथील रहिवासी असलेल्या ७१ वर्षीय वृद्ध व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेच्या विल काउंटी शेरीफ कार्यालयाने आरोपींनी दोघांवर हल्ला केला, कारण ते मुस्लिम समुदायाचे होते, असे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Israel-Hamas war)
मानवतेला लाजवेल अशा या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी, जो बायडेन यांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया सामायिक करणारे एक निवेदन जारी केले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "अमेरिकेत या घृणास्पद घटनेला स्थान नाही. ही घटना आपल्या देशाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे." राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पीडितेच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. तसेच निष्पाप आई लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान त्यांनी पॅलेस्टिनी, अरब आणि मुस्लिम अमेरिकन समुदायांप्रती देखील दु:ख व्यक्त केले आहे.