Israel-Hamas War : 'ती मोठी चूक ठरेल', 'गाझा'बाबत अमेरिकेने इस्रायलाला केले सावध | पुढारी

Israel-Hamas War : 'ती मोठी चूक ठरेल', 'गाझा'बाबत अमेरिकेने इस्रायलाला केले सावध

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यपूर्वेतील वाढत्या रक्तरंजित युद्धादरम्यान इस्रायली सैन्य गाझा पट्टी ताब्यात घेण्यासाठी सतत पुढे सरकत आहे. आतापर्यंत हमाससोबतच्या युद्धात अमेरिकेने इस्रायलला उघडपणे पाठिंबा दिला असताना आता मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Jo biden) यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (benjamin netanyahu) यांना सावध इशारा दिला आहे. ‘जर इस्रायलने गाझावर ताबा मिळवला तर ती मोठी चूक ठरेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. तथापि, हमास सर्व पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही, हमासचा संपूर्णपणे नाश व्हावा, अशी आपली इच्छा असल्याचेही बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. (Israel-Hamas War)

संबंधित बातम्या : 

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत ४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये नागरिकांची संख्या खूप जास्त आहे. मृतांमध्ये किमान २९ अमेरिकन देखील आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेने इस्त्रायलच्या समर्थनार्थ आपली युद्धनौका आणि विमानेही तैनात केली आहेत. शिवाय अमेरिकेने इराणसह इतर देशांनाही यात सहभागी न होण्याचा स्पष्ट इशारा दिला. मात्र, आता बायडेन यांनी इस्रायलने हमासच्या ताब्यातील गाझा किनारपट्टीचा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी घेराव घातल्याबद्दल इस्रायलला सावध इशारा दिला आहे. (Israel-Hamas War)

काय म्हणाले जो बायडेन?

बायडेन यांनी रविवारी एका मुलाखतीत इस्रायलला गाझा पुन्हा ताब्यात घेऊ नका असे सांगितले. बायडेन यांना मुलाखतीत विचारण्यात आले की ते गाझावरील इस्रायली कब्जाचे समर्थन करतील का? यावर बायडेन म्हणाले, “मला वाटते की ही एक मोठी चूक असेल. माझ्या मते, गाझामध्ये जे काही घडले त्याला हमास जबाबदार आहे. मात्र, हमास सर्व पॅलेस्टिनी लोकांचे प्रतिनिधित्व करत नाही. मला वाटते की गाझा पुन्हा ताब्यात घेणे इस्रायलसाठी चूक होईल. पण तेथून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची गरज आहे.”

गाझामध्ये आतापर्यंत २६७० लोकांचा बळी (Israel-Hamas War)

हमासने ७ ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला. हमासकडून हजारो रॉकेट डागण्यात आले. एवढेच नाही तर हमासचे सैनिक हवाई, समुद्र आणि सीमेद्वारे इस्रायलच्या हद्दीत घुसले होते आणि नागरिकांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये १३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २९ अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर हमासने शेकडो लोकांना ओलीसही ठेवले आहे. तेव्हापासून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करत आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये आतापर्यंत २६७० लोकांचा बळी गेला आहे. ९ हजार ६०० लोक जखमी झाले आहेत. हमासचे अनेक कमांडरही मारले गेले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button