Latest

नाशिकमध्ये एका वर्षात 419 जणांच्या आत्महत्या ; सरासरी रोज एकजण संपवतोय जीवन

गणेश सोनवणे

नाशिक : गौरव अहिरे
शहरात जानेवारी ते डिसेंबर 2021 या कालावधीत 419 जणांनी आत्महत्या केल्याचे पोलिस नोंदीवरून उघड झाले आहे. त्यात 12 ते 82 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये बेरोजगारी, आर्थिक – कौटुंबिक – आरोग्य समस्या, नैराश्य, वेडसरपणा या मुख्य कारणांचा समावेश आढळून आला आहे. सर्वाधिक आत्महत्या गळफास घेत करण्यात आल्या आहेत.

आयुष्याचा गाडा चालवताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातून बहुतांश नागरिक संकटावर मात करीत मार्ग शोधून काढतात. तर काहींना मार्ग सापडत नसल्याने ते हताश होतात. हताश झालेल्यांपैकी अनेक जण पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करून संकटावर मात करतात, काही जण हतबल होऊन आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकून शहरातील 419 नागरिकांनी गळफास, विष सेवन करून, पाण्यात उडी मारून, इमारतींवरून उडी मारून, रेल्वेखाली झोकून देत किंवा जाळून घेत आयुष्याचा शेवट केला. यात धक्कादायक बाब म्हणजे 12 ते 18 वयोगटातील 30 अल्पवयीन मुलामुलींचा समावेश असून 60 ते 82 वयोगटातील 25 ज्येष्ठ नागरिकांनीही आयुष्याचा शेवट केला. सर्वाधिक आत्महत्या रात्रीच्या सुमारास झाल्या आहेत.

आत्महत्या करणार्‍यांमध्ये 211 पुरुषांनी व 69 महिलांनी गळफास घेतला आहे. तर 59 पुरुष व 25 महिलांनी विष सेवन करून आत्महत्या केल्या. यामध्ये सहा जणांनी सॅनिटायझर पिऊन, एकाने रॉकेल पिऊन आत्महत्या केली आहे. त्याचप्रमाणे 25 पुरुषांनी रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्या आहेत. तर उर्वरीत 30 जणांनी पाण्यात उडी मारून, उंचावरून उडी मारून, जाळून घेत आत्महत्या केल्या आहेत.

ओळख अन् कारणे गुलदस्त्यात
शहरात दोन घटनांमध्ये पालकांनी स्वत: आत्महत्या करताना त्यांच्या चिमुकल्यांचाही जीव घेत आत्महत्या केल्या. या घटनांनी हळहळ व्यक्त झाली होती. अनेक प्रकरणांमध्ये आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मोजक्याच घटनांमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही घटनांमध्ये आत्महत्या करणार्‍या व्यक्तींची ओळखही पटलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचेही कारणही गुलदस्त्यात आहे.

तर आत्महत्येपासून परावृत्त
आत्महत्या करण्याआधी कोणतीही व्यक्ती बर्‍याच दिवसांपासून ताणतणावात किंवा उदासिन असते. याकडे दैंनदिन जीवनातील ताणतणाव आहे असे समजून नागरिक दुर्लक्ष करतात. मात्र याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन आयुष्यात कामात मन न रमणे, जोप न लागणे, सतत निरुत्साह वाटणे, आत्मविश्वासाची कमी, सतत रडू येणे अशी लक्षणे असल्यास त्या व्यक्तीने जवळील व्यक्तींशी किंवा मानसोपचार तज्ञांसोबत मोकळेपणाने संवाद साधावा. संवाद साधून, योग्य उपचारातून निश्चित मार्ग मिळतो व ती व्यक्ती 100 टक्के आत्महत्येपासून परावृत्त होते.
– डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ञ, अध्यक्ष, आयएमए

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : कवठेमंकाळ नगरपंचायत आबांच्या बछड्यांन मैदान मारलं

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT