नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील अंबड-लिंक रोडवरील भंगारमालाचे व स्टील विक्री करणार्या तिघा व्यावसायिकांनी (GST fraud) जीएसटीचा इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करून कागदोपत्री सुमारे 200 कोटींहून अधिक माल पुरवठा केल्याचा व्यवसाय दाखवला. या व्यवसायाच्या मोबदल्यात सुमारे 18 कोटींचा इनपूट टॅक्स क्रेडिट तिघा व्यावसायिकांनी घेतल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या तिघांनीही न्यायालयात अटकपूर्वसाठी प्रयत्न केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्याने जीएसटी महाराष्ट्र प्रतिबंध शाखेकडून तिघांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जीएसटीच्या नाशिक आयुक्तालय विभागाने हा घोटाळा (GST fraud) उघडकीस आणला असून, एकाच कुटुंबातील तिघा संशयितांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, संशयितांनी चौकशीस जाणे टाळले असून, अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अंबड लिंक रोडवरील संजीवनगर महाराष्ट्र स्टील ट्रेडर्सचे अजिमुल्ला नईम चौधरी, हिरा स्टीलचे हफिजुल्ला चौधरी आणि गौरी इस्पातचे अत्ताउल्ला चौधरी या तिघांना जीएसटीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यापैकी याच प्रकरणात बनावट आयटीसी मिळवणार्या अत्ताउल्ला नईम चौधरी यास काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीएसटी अधिकार्यांच्या चौकशीत मुंबईच्या एका फर्मकडून बनावट आयटीसी घेतल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचे समोर येत आहे. तिघा संशयितांनी गैरप्रकारे इनव्हॉइसवर इनपूट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. दोन्ही कंपन्यांनी दाखल केलेल्या जीएसटी रिटर्न्सनुसार प्रत्यक्षात जागेवर काहीच स्टॉक उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यांच्या दोन्ही फर्मची जीएसटी नोंदणी 25 मार्चपासून रद्द करण्यात आला आहे. सीजीएसटी कायदा, 2017 व सुधारित 2022 च्या तरतुदीनुसार संशयितांनी जीएसटी पर्यायाने शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
अनु एंटरप्रायजेसचे मालक दाखवलेल्या व्यक्तीच्या जबाबानुसार, या फर्मबद्दल त्यांना काहीच माहीत नव्हते. पत्ता आणि खरेदी, विक्री आणि बँक व्यवहाराशी संबंधित सर्व बाबी अताउल्ला चौधरी यांच्याकडूनच केल्या जात होत्या. यावरून महाराष्ट्र स्टील, हिरा स्टील, अनु एंटरप्रायजेसने जारी केलेल्या इनव्हॉइसवर बनावट आयटीसी घेतला होता. दोन्ही कंपन्यांच्या सप्टेंबर ते डिसेंबर कालावधीत खरेदी आणि विक्रीच्या पडताळणी केल्यावर, हिरा स्टीलकडे 10 कोटी 30 लाख 57 हजार आयटीसी, तर महाराष्ट्र स्टीलकडे चार कोटी 17 लाख 34 हजारांची शिल्लक आवश्यक आहे. मात्र, दोन्ही अर्जदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केवळ 9 लाखांचा साठा आढळला. (GST fraud)
कामगाराच्या नावे बनावट कंपनी
संशयित अज्जीमुल्ला चौधरी यांनी महाराष्ट्र स्टील ट्रेडर्स ही फर्म तयार केली. त्याद्वारे प्रसिद्ध केलेल्या इनव्हॉइसवर मिळवलेल्या आयटीसी परत करण्यासाठी सप्टेंबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत एक बनावट कंपनी स्थापन करून त्याद्वारे आयटीसी मिळवल्याचे दिसते. दुसरे व्यापारी हफिजुल्लाह यांनी हिरा स्टील फर्म व गौरी इस्पात यांनी जारी केलेल्या इनव्हॉइसवर मिळवलेल्या आयटीसी परत करण्यासाठी याच कालावधीत आणखी एक बनावट कंपनी बनवून आयटीसी मिळवली. या दोघांपाठोपाठ अत्ताउल्ला नइम चौधरी यांनी गौरी इस्पात, तेज स्टील आणि गजानन एंटरप्रायजेस या फर्म बनविल्या होत्या. तपासादरम्यान अनु एंटरप्रायजेस नावाच्या पुरवठादारांपैकी एकाची जीएसटीआयएन क्रमांकावरून छाननी केली असता चुंचाळे गावात छोट्या खोलीत राहणार्या व्यक्तीला दोन्ही फर्मने मालाचा पुरवठा केल्याचे समजते.