पुणे : पालिकेच्या सहायक आयुक्त, शिपाईसह तीन लाचखोर जाळ्यात | पुढारी

पुणे : पालिकेच्या सहायक आयुक्त, शिपाईसह तीन लाचखोर जाळ्यात

पुणे,पुढारी वृत्तसेवा : ड्रेनेज लाईन व सिमेंट रस्त्याच्या केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी ठेकेदेराकडून 15 हजार रुपयांची लाच घेण्यात आली आहे. याप्रकरणी महापालिकेच्या कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त सचिन तामखेडे (वय 34) यांच्यासह तिघांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यामध्ये कनिष्ठ अभियंता अनंत रामभाऊ ठोक (वय 52), शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे (वय 47) यांचा देखील समावेश आहे.

याबाबत 31 वर्षीय ठेकेदाराने तक्रार दिली आहे. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात तिघांवर भ्रष्टाचार अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या दोन अधिकार्‍यांवर कारवाई झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी कोथरूड परिसरात ड्रेनेज व सिमेंटच्या रस्त्याची कामे केली आहेत. या कामाचे बील मिळावे म्हणून सहायक आयुक्त तामखेडे यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपयांची मागणी केली. मात्र लाच द्यायची नसल्यामुळे तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीकडून या तक्रारची पडताळणी केली असता बील काढण्यासाठी तामखेडे यांनी 15 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

एसीबीकडून सोमवारी कोथरुड येथील क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी तामखेडे यांनी लाचेची रक्कम ही कनिष्ठ अभियंता ठोक यांच्याकडे देण्यास सांगितली. ठोक यांनी ही रक्कम शिपाई किंडरे यांच्याकडे देण्यास सांगितले. किंडरे यांनी ही रक्कम घेतल्यानंतर एसीबीच्या अधिकार्‍यांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यानुसार कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक भरत साळुंके हे अधिक तपास करत आहेत. एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Back to top button