पुढारी ऑनलाईन डेस्क : Prithvi vs Shreyas : दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉचा धडाकेबाज फॉर्म रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कायम राहिला. पृथ्वीने 29 चेंडूत 51 धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. आयपीएल 2022 मधील हे त्याचे दुसरे आणि आयपीएल कारकिर्दीतील 12वे अर्धशतक आहे. पृथ्वीने डेव्हिड वॉर्नरसह दिल्लीसाठी डावाची सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी 8.4 षटकांत 93 धावांची भागीदारी केली.
आयपीएल 2022 च्या 19 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 44 धावांनी पराभव केला. कुलदीप यादवने चार विकेट घेत दिल्लीच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पण इथे आपण पृथ्वी शॉच्या फलंदाजीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. दिल्लीला झंझावाती सुरुवात करून देताना शॉने 29 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. सुरुवातीपासूनच पृथ्वीने कोलकाताच्या गोलंदाजांना आपल्या रडारवर घेत जोरदार फटकारले. यामुळे दिल्लीला निर्धारित 20 षटकांत 215 धावांपर्यंत मजल मारता आली. (Prithvi vs Shreyas)
दरम्यान, पृथ्वी शॉ फलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरलाही काय करावे हे समजत नव्हते. खुद्द श्रेयसनेच या सामन्यानंतर पृथ्वीच्या खेळीबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, 'पृथ्वी शॉने पहिल्याच षटकापासून जोरदार सुरुवात केली. पृथ्वीने गोलंदाजांना रडारवर घेतले. पृथ्वी शॉ असा फलंदाज आहे जो पॉवरप्लेमध्ये सामना फिरवू शकतो. मी याआधी त्याच्यासोबत खेळलो आहे आणि तो खूप छान फटकेबाजी करतो. कर्णधार या नात्याने त्याच्याविरुद्ध कुठे क्षेत्ररक्षण लावाले हेच मला समजत नव्हते. पृथ्वीच्या फटकेबाजी समोर क्षेत्ररक्षण कसे लावावे याबाबत डोक्यात घोळ सुरू झाला होता. काहीच समजत नव्हते. पृथ्वीने डेव्हिड वॉर्नरच्या साथीने मोठी भागीदारी रचली. खेळपट्टी फलंदाजीसाठी खरोखरच चांगली होती. केकेआरने धावांचा पाठलाग करत तीन सामने जिंकले, पण दिल्ली विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही,' असे त्याने सांगितले. (Prithvi vs Shreyas)
मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने केकेआरचा 44 धावांनी पराभव केला. दिल्लीच्या 216 धावांच्या लक्ष्यासमोर केकेआरचा संपूर्ण संघ 171 धावांवर गारद झाला. या काळात कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 54 धावांची खेळी खेळली. दिल्लीकडून कुलदीप यादवने चार आणि खलील अहमदने तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचली असून केकेआर अव्वल स्थानावर आहे. (Prithvi vs Shreyas)