वास्को : पुढारी वृत्तसेवा
विविध प्रकरणांनी गाजत असलेल्या मुरगाव मतदारसंघातून कोण विजयी होतो, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी या मतदारसंघामध्ये उलथापालथ होण्यास सुरुवात झाला आहे. या मतदार संघातील तथाकथित नेत्यांची भाजपातून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपामध्ये ये-जा सुरू झाली आहे. 'हा आला म्हणून शक्ती वाढली' तसेच 'तो गेला म्हणून काहीच फरक पडत नाही' अशी विधाने ऐकू येत आहेत.कोण कधी पलटी मारील हे सांगता येत नसल्याने भाजप व काँग्रेसवाले सध्या मोठी सावधगिरी बाळगत आहे. विकास कामे, रोजगार, नैतिकता-अनैतिकता, प्रदूषण आदी विविध प्रश्नांवर समाज माध्यमावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे मतदारांची करमणूकही होत आहे.
मुरगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार तथा विद्यमान आमदार मिलिंद नाईक व गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी व काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांच्यामध्ये तिसर्यांदा लढत होणार आहे. मिलिंद नाईक हे चौथ्यांदा विजयी होण्यासाठी तर संकल्प आमोणकर हे पराभवाची हॅट्ट्रीक खंडित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोन्ही बाजूनी विजयाचा दावा करण्यात येत आहे. मुरगाव मतदारसंघामध्ये लोकांना पाहिजे ती विकासकामे झाली नसल्याचा दावा काँग्रेसकरत आहे तर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचा दावा भाजप करत आहे. (गोवा निवडणूक पक्षांतर)
भाजपचे मिलिंद नाईक, काँग्रेसचे संकल्प आमोणकर, गोवा तृणमूल काँग्रेसचे जयेश शेटगावकर, 'आप'चे परशुराम सोनुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख महंमद (इक्बाल), 'आरजी'चे परेश तोरस्कर, अपक्ष उमेदवार नीलेश नावेलकर, अपक्ष इनायतुल्ला शेख या आठ उमेदवारांचा समावेश आहे. आमोणकर यांच्या पॅनेलातून गेली पालिका निवडणुक लढविणारे नीलेश नावेलकर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे आहेत तर शेखर खडपकर यांनी मिलिंद नाईक यांची साथ धरली आहे.
जयेश शेटगावकर हे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे आमोणकर यांच्या मतांवर काही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मुरगाव मतदार संघामध्ये मिलिंद नाईक व संकल्प आमोणकर यांच्यामध्येच लढत असल्याने इतर उमेदवारांचा म्हणावा तसा प्रभाव पडणार नाही, असा दावा काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. (गोवा निवडणूक पक्षांतर)
मुरगाव मतदारसंघातून 1963 साली युनायटेड गोवन्स पार्टी (सिक्वेरा गट) च्या आर्मिला मास्कारेन्हस, 1967 साली मगोचे गजानन पाटील, 1972 साली मगोचे वसंतराव जोशी जिंकले होते. त्यानंतर चार वेळा काँग्रेसचे शेख हसन हरूण जिंकले होते. ते एकवेळा अर्स काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यामुळे पाचवेळा शेख हसन विजयी झाले होते. जॉन मान्युअल वाझ हे अपक्ष तर त्यांचे पुत्र कार्ल वाझ हे काँग्रेसच्या तिकीटावर जिंकले होते. त्यानंतर 2007 पासून मिलिंद नाईक हे जिंकत आहेत. यंदाची निवडणुकही मिलिंद नाईक विरुध्द संकल्प आमोणकर अशीच होणार आहे. या निवडणुकीत उतरलेले परशुराम सोनुर्लेकर यांनी गत विधानसभा निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेख महंमद तसेच गोवा तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जयेश शेटगावकर यांनी गत पालिका निवडणूक लढविली होती. परंतू ते पराभूत झाले होते. (गोवा निवडणूक पक्षांतर)
हेही वाचलत का?