सातारा : पुढारी वृत्तसेवा
किल्ले अजिंक्यतारा मार्गावरील सुमारे 18-20 पथदिव्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर पुन्हा अंधार दाटला असून अशा अपप्रवृत्तींवर सातारा पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
किल्ले अजिंक्यताराचा समावेश शहर हद्दीत झाला आहे. हा किल्ला सातारा पालिकेच्या ताब्यात आला आहे. त्यामुळे किल्ल्याची देखभाल व दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. या किल्ल्यावर नगरपालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. सुशोभिकरणाचे काम नगरपालिकेकडून लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
गोडोली नाका ते किल्ले अजिंक्यतारा मार्गावर नगरपालिकेकडून पथदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र मंगळाई मंदिरापासून पुढील मार्गावरील 18-20 पथदिव्यांची काही अपप्रवृतींकडून तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा या मार्गावर अंधार दाटू लागला आहे. या मार्गावर पहाटेपासूनच नागरिकांची फिरण्यासाठी वर्दळ असते.
सायंकाळी बरेच लोक अजिंक्यतारा किल्ल्यावर जात असतात. मात्र पथदिव्यांची तोडफोड झाल्यामुळे तिथे अंधाराचे साम्राज्य पसरत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. नगरपालिकेने संबंधित अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत. पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.