कोल्हापूर : कॅन्सरग्रस्तांना महिन्याला दीड कोटीची ’अर्थ’वेदना | पुढारी

कोल्हापूर : कॅन्सरग्रस्तांना महिन्याला दीड कोटीची ’अर्थ’वेदना

कोल्हापूर ; एकनाक नाईक : जिल्ह्यात दिवसेंदिवस कॅन्सरबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कॅन्सरचे 200 पेक्षा अधिक प्रकार आहेत; पण कार्सिनोमा, सोरकोमा, लिम्फोमा आणि ल्युकेमिया हे कॅन्सरचे महत्त्वाचे प्रकार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्तांना दरमहा तब्बल दीड कोटी रुपयांपर्यंतची औषधे लागतात. कॅन्सरसह ‘अर्थ’वेदना रुग्णांना सोसवेना झाली आहे.

कार्सिनोमा हा प्रकार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. महिलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ग्लोबल कॅन्सर सर्व्हेच्या अहवालानुसार, भारतात ब्रेस्ट कॅन्सरचे 54 ते 55 टक्के, गर्भ कॅन्सरचे प्रमाण 12 टक्के, तर आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण 11 टक्के आहे. वर्षागणीक ही टक्केवारी वाढत आहे. जगात लंग कॅन्सरचे प्रमाण 11.9, तर ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण 11.8 टक्के इतके आहे. पश्‍चिमात्त्य देशांचे अनुकरण, बदलती जीवनशैली, आहारातील बदल, स्तनपान न करणे, उशिरा लग्‍न, चरबीयुक्‍त पदार्थांचे सेवन, वाढता ताणतणाव आदी कारणे कॅन्सरवाढीस कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

कार्सिनोमा कॅन्सरचा सर्वाधिक प्रभाव

कॉर्सिनोमा कॅन्सर महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. त्यात ब्रेस्ट कॅन्सर, गर्भपिशवी आणि योनीला जोडणार्‍या अवयवाच्या उतींमध्ये तयार होणार्‍या कर्करोगाचा समावेश आहे. पुरुषांमध्ये डोके, मान, फुफ्फुस आणि अन्‍ननलिका, तोंडाचा, जिभेचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळतो.

लहान मुलांमध्ये आढळणारा कॅन्सर

कॅन्सर एक वर्षाच्या बाळापासून पुढील वयाच्या व्यक्‍तीलाही होऊ शकतो. लहान मुलांमध्ये रेटिनोब्लोस्टोमा, विल्म्स ट्युमर आणि रक्‍ताचा कॅन्सर हे सामान्य कॅन्सरचे प्रकार आढळतात.

तंबाखूजन्य पदार्थ कॅन्सरचे मूळ

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या अहवालानुसार, कॅन्सरचे मूळ म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ होय. त्यामुळे कॅन्सरशी लढा द्यायचा असेल, तर आधी तंबाखूशी लढा देणे गरजेचे आहे.

रुग्णांचा हलगर्जीपणा

कॅन्सर झाला आहे हे माहीत असूनही काही रुग्ण उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. रुग्ण कॅन्सरच्या तिसर्‍या किंवा चौथ्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होतात. तोपर्यंत रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना कठीण होऊन जाते. स्त्रियांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाचा कॅन्सर, तर पुरुषांमध्ये डोके आणि मानेचा कॅन्सर अशी कॅन्सरची लक्षणे लवकर दिसतात. त्यामुळे वेळेत उपचार घेणे महत्त्वाचे असते.

Back to top button