नाशिक : पुढारी वृत्तसेवा : भाजप नेते आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या वाक्युद्धावरून आगामी महापालिका निवडणुकीच्या वातावरणात अधिक गरमागरमी निर्माण झाली आहे. भाजपविरोधात खासदार राऊत यांनी आज (दि. 15) पोलखोल करण्याचा इशारा दिला असून, उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख या नात्याने त्यांना पाठबळ देण्यासाठी नाशिकमधून मुंबईला पदाधिकारी जाऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
महाविकास आघाडीतील मंत्री तसेच अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. त्यात आता खा. राऊत यांचेही नाव घेतले जात असल्याने भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढला आहे. भाजपची पोलखोल करण्यासाठी आज (दि.15) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. त्यासाठी नाशिकसह राज्यभरातून शिवसेनेचे खासदार, आमदार तसेच पदाधिकारी जाणार आहेत. त्यासाठी शिवसेना पदाधिकार्यांकडून जमवाजमवी केली जात आहे. राज्यात भाजपविरुद्ध शिवसेना असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ना. राणे यांच्याविरोधात नाशिकमधून गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे नाशिक एकदम चर्चेत आले होते. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधून खा. राऊत यांच्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली असून, शक्तिप्रदर्शन करून राऊत यांचे लक्ष यानिमित्ताने वेधून घेतले जाणार आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील नेते, मंत्र्यांना नाहक टार्गेट केले जात आहे. मात्र, आता हे सहन केले जाणार नाही. उत्तर देण्यासाठी शिवसैनिक सक्षम आहे असून, शिवसेना स्टाइल उत्तर दिले जाईल.
– भाऊसाहेब चौधरी,
संपर्कप्रमुख, शिवसेना