जगातील सर्वात महागडे कबुतर | पुढारी

जगातील सर्वात महागडे कबुतर

बीजिंग ; उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन यांची चर्चा तर जगभर होत असते. या सनकी हुकुमशाहच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. मात्र, सध्या ‘किम’ नावाचा हा माणूस नव्हे तर एक कबुतर चर्चेत आले आहे. हे कबुतर जगातील सर्वात महागडे कबुतर ठरले असून त्याची तब्बल 14 कोटी रुपयांना विक्री झाली आहे.

हे एक मादी कबुतर असून चीनमधील एका व्यक्तीने लिलावात सर्वाधिक बोली लावत या कबुतराला खरेदी केले. हे साधे कबुतर नसून ते एक ‘रेसिंग’ म्हणजेच शर्यतीत भाग घेणारे कबुतर आहे. अर्थात ते सध्या निवृत्त झाले असले तरी त्याचा भाव कायम आहे. ‘न्यू किम बेल्जियम’ असे या कबुतराचे नाव असून ते दोन वर्षांचे आहे.

2018 मध्ये या कबुतराने अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. नॅशनल मीडल डिस्टन्स रेसमध्ये विजेते ठरलेल्या या कबुतराचा उड्डाणाचा वेग उत्कृष्ट आहे. चीनमध्ये कबुतरांच्या शर्यती लोकप्रिय आहेत. तिथे मादी रेसिंग कबुतरांचा वापर चांगल्या रेसर कबुतरांच्या निर्मितीसाठीही केला जातो. मात्र, त्यासाठी कुणी एखाद्या मादी कबुतरावर इतकी मोठी बोली लावल्याचे उदाहरण नव्हते. आता किमने अर्मांडो या कबुतराकडून जगातील सर्वात महागडे कबुतर असण्याचा किताब काढून घेतला आहे.

Back to top button