सिडको : पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील सिडको परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास रिपाइंच्या (RPI) चे पदाधिकारी प्रशांत जाधव हे उत्तमनगरकडून घरी जात असतांना अज्ञात व्यक्तींनी पाठीमागून येऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबारानंतर रात्री जाधव यांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रात्री यशस्वी शस्त्रक्रीया झाली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास आरपीआय चे पदाधिकारी प्रशांत जाधव हे दुचाकी वरून उत्तमनगर कडून घरी उपेंद्रनगर भागात जात असतांना उत्तम नगर भागात प्रशांत जाधव यांच्यावर पाठी मागून दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यांच्या मांडीवर दोन गोळ्या लागल्या आहेत.
जखमी अवस्थेत जाधव यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना स्वतः फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर परिसरातील कार्यकर्त्यांनी जाधव यांना खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. या नंतर घटनास्थळी पोलिस उपायुकत खरात, सहायक पोलिस आयुक्त शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख सह पोलिस अधिकारी दाखल झाले. रूग्णालयात रात्री नाना लोढे, संजय भामरे समवेत विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. रुग्णालयात डॉक्टरांनी जाधव यांच्या मांडीवर शस्त्रक्रीया करून गोळी काढली.
या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. गोळीबार नेमका कोणी केला व का केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. याकरिता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेमुळे सिडको परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.