लाहोर; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam-ul-Haq) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाहोर येथे सोमवारी सायंकाळी इंजमाम उल हक यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना तब्येतीचा त्रास जाणवत होता. त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी इंजमाम ((Inzamam-ul-Haq) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर ५१ वर्षीय इंजमाम यांना रुग्णालयात नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
इंजमाम यांनी पाकिस्तानचे सर्वांधिक यशस्वी कर्णधार म्हणून कारकिर्द गाजवली. ९० च्या दशकात त्यांची धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख राहिली.
इंजमाम यांनी पाकिस्तानकडून खेळताना ११९ टेस्ट सामन्यांत ८,८२९ धावा केल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये पाकिस्तानकडून सर्वांधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्यांचे स्थान तिसरे आहे.
त्यांनी २००७ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. इंजमाम यांनी पाकिस्तानकडून ३७५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ११,७०१ धावा केल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
इंजमाम यांच्या प्रकृतीच्या अस्वास्थाच्या वृत्तानंतर त्यांचे चाहते ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.