लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा
हवेली तहसिल कार्यालयातील न्यायालयीन कामकाजाच्या संचिका (कोर्ट केस फाईल) कार्यालयात सुरक्षित ठेवण्याऐवजी चक्क एका दलालाकडे ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार हवेलीच्या तहसिल कार्यालयात घडला आहे. या घटनेमुळे बेजबाबदार व भोंगळ कारभारामुळे महसूल विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. जिल्हा महसूल विभागाचे हवेली तालुक्याच्या महसूल प्रशासनात नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.
पुणे जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील तालुका म्हणून हवेली तालुक्याकडे पाहीले जाते. हवेली तालुक्यात राज्याच्याच नव्हे तर देशातील मोठ्या राजकारण्यासह अधिकाऱ्यांचे लक्ष असते. देशभरातून येथे जमिनीत गुंतवणूक झालेली आहे. या तालुक्यात काम करणे म्हणजे काटेरी मुगुट. येथे चोख जबाबदारीने व डोळ्यात तेल घालून काटक्षाने काम करावे लागते. परंतु जिल्ह्याच्या महसूल विभागाचे अजिबात नियंत्रण नसल्याने हवेली तहसीलदार कार्यालयात चाललेल्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसला आहे.
या तालुक्यातील काही ठराविक मंडलामध्ये पारदर्शक कारभार दिसतो, तर काही मंडलामध्ये अजिबात नियंत्रण नसल्याचे प्रकर्षाने जाणवते या कार्यालयात दोन विभाग करुन कोर्ट केसेस चालविल्या जातात. प्रशासकीय काम एकच विभाग चालवतो. मामलेदार कोर्ट ॲक्ट अधिनियमानुसार चाललेल्या केसेसच्या फाईली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. या फाईली कार्यालयात ऊपलब्ध होण्याऐवजी कार्यालयात आर्थिक देवाण घेवाण करणाऱ्या दलालांकडे असल्याने हवेली तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोर्ट केसेसचे निकाल या दलालांना दाखवून बनवले जात असल्याचा गंभीर प्रकार हवेली तालुक्यातील तहसिल कार्यालयात पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील एका शेतकऱ्याने लेखी तक्रार केल्याने हा गंभीर प्रकार ऊघड झाला आहे. या शेतकऱ्याने त्याच्या केसेसची नक्कल मागणी केली असता, फाईल दलालाकडे असल्याचे ऊत्तर मिळाल्याने शेतकरी आश्चर्यचकीत झाला. चार दिवस चकरा मारूनही त्याची फाईल कार्यालयात जमा झाली नसल्याने या शेतकऱ्याने लेखी तक्रार केली आहे. या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे लक्ष घालुन चौकशीचे आदेश देणार का, हा चर्चेचा विषय तालुक्यात सुरू आहे. सध्या कार्यालयातील या सावळागोंधळाला कंटाळुन अनेक कर्मचारी सक्तीच्या रजेवर गेले आहेत. तहसिल कार्यालय हे दलालांच्या दावणीला बांधले असल्याने महसूल कर्मचारी ते आहेत, का दलाल आहेत हे सांगणे आता कठीण होऊन बसले आहे
हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अर्धन्यायीक कोर्ट केस कार्यालयात नसल्याची लेखी तक्रार एका शेतकर्यांने तक्रार केली आहे. या संदर्भात नायब तहसीलदारांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यालयातून फाईल गायब होणे अत्यंत गंभीर बाब आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाले नंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे तहसीलदार कोलते यांनी सांगितले