न्युयॉर्क ; पुढारी ऑनलाईन : ब्रिटनच्या १८ वर्षीय एम्मा रादुकानूने यूएस ओपन (US Open 2021) महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. गेल्या ५३ वर्षात हे विजेतेपद पटकावणारी ती पहिली ब्रिटिश महिला ठरली आहे. एम्मा रादुकानूने कॅनडाच्या लीला फर्नांडिसचा ६-४, ६-३ असा पराभव करत ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली होती. मात्र, यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत रादुकानूने बाजी मारली.
एम्मा रादुकानूच्या यशानंतर यूएस ओपनच्या ऑफिशियल ट्विटर हँन्डलवरून ट्वीट करण्यात आले. ५३ वर्षांची प्रतीक्षा संपली. १९६८ नंतर यूएस ओपनचे ((US Open 2021) विजेतेपद पटकावणारी ती पहिली ब्रिटिश महिला ठरली आहे.
रादुकानूने आतापर्यंत यूएस ओपनमध्ये एकही सेट गमावला नाही. तिने आपले सर्व १८ सेट जिंकले आहेत. पात्रता फेरीचे ३ सामने आणि मुख्य ड्रॉ च्या ६ सामन्यांचा समावेश आहे. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत दोन तरुणी आमने-सामने येण्याची १९९९ नंतरची ही पहिलीच वेळ आहे. १९९९ मध्ये, १७ वर्षीय सेरेना विल्यम्स आणि १८ वर्षीय मार्टिना हिंगीस या दोन खेळाडूंमध्ये लढत झाली होती.
१९७७ मध्ये विम्बल्डनमध्ये व्हर्जिनिया वेड नंतर ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकणारी रादुकानू ही पहिली ब्रिटिश महिला आहे. २००४ मध्ये विम्बल्डन जिंकणारी मारिया शारापोव्हा तेव्हा १७ वर्षांची होती. त्यानंतर ग्रँडस्लॅम जिंकणारी ब्रिटनची १८ वर्षीय एम्मा रादुकानू ही सर्वात लहान खेळाडू ठरली आहे.