Tech Info : दिव्यांगांच्या पंखांना नव तंत्रज्ञानाचे बळ… | पुढारी

Tech Info : दिव्यांगांच्या पंखांना नव तंत्रज्ञानाचे बळ...

डॉ. दीपक शिकारपूर

Tech Info जपानमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय दिव्यांग खेळाडूंच्या संघाने देदीप्यमान यश मिळवले. शारीरिक अपंगत्व असेल तर धीर न सोडता सतत प्रयत्न केले तर, धडधाकट व्यक्तींपेक्षा दिव्यांग पुढे जाऊ शकतात हा मोठा संदेश या निमित्ताने मिळाला आहे. दिव्यांगांच्या जीवन संघर्षात मदत करायला आधुनिक तंत्रज्ञान अनेक प्रकारे सहाय्य करू शकते.

संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन्स, त्यांमधील अ‍ॅप्स व तत्सम सुविधा आणि ‘वेअरेबल्स’ यांनी दिव्यांगांना चांगलाच मदतीचा हात दिला आहे, तोही तुलनेने कमी खर्चात अधिक सोयी पुरवून. याआधीच्या यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल युगातील अशा सहायक यंत्रणा मोठ्या आकाराच्या आणि वजनदारही असत. त्यांच्या मानाने इलेक्ट्रॉनिक वस्तू अगदीच छोट्या आणि हलक्या असल्याने त्यांचा वापर करणे सहज बनले आहे.

संगणकीय तंत्रज्ञानामुळे दिव्यांगांच्या सामाजिक, कौटुंबिक (आणि मुख्य म्हणजे) आर्थिक स्थितीत खूपच सकारात्मक फरक पडला आहे. कुशाग्र बुद्धीच्या परंतु शारीरिक मर्यादांमध्ये जखडलेल्या व्यक्तीला संगणकीय तंत्राचे सहाय्य मिळण्याचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे थोर संशोधक (कै.) स्टीफन हॉकिंग! हॉकिंग ह्यांना ‘मोटर-न्यूरॉन’ प्रकारचा आजार असल्याने बोलणे, लिहिणे-वाचणे इत्यादी क्रिया करता येत नव्हत्या.

मात्र त्यांच्या मेंदूतील विचारप्रक्रिया समजून घेणे शक्य झाले आहे ते निव्वळ संगणकीय उपकरणांमुळेच. अन्यथा हॉकिंग ह्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ इतरांना कधीच मिळू शकला नसता.

ज्यांना बोलण्याची समस्या आहे किंवा ज्यांना विचार शब्दांत व्यक्त करता येत नाहीत अशांना सहाय्य करणारी अनेक उपकरणे व सुविधा – बर्‍याच दशकांपासून – जगभर उपलब्ध आहेत. त्यांना ‘ऑग्मेंटेटिव्ह अँड अल्टरनेटिव्ह कम्युनिकेशन डिव्हाइसेस’ Augmentative and Alternative Communication – AAC – devices (वर्धक आणि पर्यायी संवाद साधने) असे नाव आहे.

इंपल्स सिस्टीम

हातापायांचे अपंगत्व असलेल्यांना, कोणत्याही यांत्रिक साधनांची मदत न घेता, संगणक वापरणे शक्य होते एबलनेट कंपनीच्या ‘इंपल्स सिस्टीम’मुळे. नावाप्रमाणेच ही प्रणाली वापरकर्त्याच्या मेंदूत उत्पन्न होणार्‍या तरंगांचा ऊर्फ विचार-प्रेरणांचा उपयोग संगणक चालवण्यासाठी करून घेते.

वाचकांपैकी बहुतेकांना माहीत असेलच की मेंदूकडून स्नायूंना दिल्या जाणार्‍या आज्ञा सूक्ष्म वीजलहरींच्या रूपात असतात. या लहरी वाचण्याच्या शास्त्राला ‘इलेक्ट्रोमायोग्राफी’ असे नाव आहे. या संकल्पनेवर चालणारे एक अगदी छोटे उपकरण अशा व्यक्तीच्या डोक्यावर (शक्यतो कपाळावर – म्हणजे संगणकाशी त्याचा थेट संपर्क कमीत कमी अंतरातून होऊ शकतो) बसवले जाते.

या विचारतरंगांचे वर्धन करून म्हणजेच त्यांना अ‍ॅम्प्लिफाय करून त्यांच्या बिनतारी प्रक्षेपणाद्वारे संगणकाशी संवाद साधून कामे करवून घेता येतात, की बोर्ड आणि माऊसला फाटा देऊन. ही डबी चेहर्‍यावर कोठेही तसेच मानेवरही चिकटवता येते. मुख्य म्हणजे डोळा विशिष्ट प्रकारे बंद करून किंवा अगदी हसून देखील वापरकर्ता ह्या हालचालींमार्फत संगणकाशी ‘बोलू’ शकतो.

जोस् टू : इलेक्ट्रॉनिक्सची आणि त्यातही संगणकीय यंत्रणांशी संबंधित साधनांची दुनिया अजब आहे हेच खरे! संगणकाकाडून कामे करवून घेण्यासाठी – फक्त दहा-वीस वर्षांपूर्वी स्वप्नातही न आलेल्या – कोणत्याही मानवी हालचालींचा वापर आता शक्य होतो आहे आणि अपंगांना हे मोठेच वरदान ठरते आहे. आता हे ‘सिप अँड पफ् जॉस् टू’ पाहा ना.

वापरकर्त्याच्या ओठांच्या थोड्याफार हालचाली आणि त्याने नळीत मारलेली फुंकर वा ओठांनी ओढलेला श्वास एवढ्यानेही आता संगणक चालवता येईल! यासाठी बनवलेली ‘जॉयस्टिक’ चेहर्‍यावर कोणत्याही ठिकाणी टेकवून, अगदी जिभेच्या टोकाने सुद्धा चालवता येईल.

नॅचरल पॉईंटचे ‘स्मार्टनॅव फोर – ए टी’-

मान हलवून किंवा डोलवून नाही वा हो म्हणण्याची पद्धत तर पुराणकाळापासून वापरली जात आहेच! तिचेच नवतांत्रिक रूप आता विकलांगांच्या मदतीला आले आहे. ज्यांचे स्वतःच्या डोक्याच्या हालचालींवर पुरेसे नियंत्रण आहे, अशांना (माऊस आणि की बोर्ड वापरणे शक्य नसतानाही) संगणक चालवता येणार आहे. ‘स्मार्टनॅव फोर’मध्ये संगणकाच्या पडद्याच्या वरील बाजूस एक इन्फ्रारेड स्कॅनर बसवलेला असतो (वेबकॅम प्रमाणेच).

प्रणालीचे काम चालू होण्यासाठी वापरकर्त्याने स्वतःच्या कपाळावर विशिष्ट परावर्तक द्रव्याचा एक ठिपका चिकटवणे गरजेचे असते (अगदी कुंकवाची टिकली लावल्याप्रमाणेच). अर्थात हा ठिपका संबंधित व्यक्ती चष्मा लावत असेल किंवा हेडफोन्स इत्यादी वापरत असेल तर त्यांवरही चिकटवता येतो म्हणा. असो. मॉनिटरवरील इन्फ्रारेड प्रेषकातून निघणारे किरण या ‘बिंदी’ वरून परावर्तित होतात.

आता वापरकर्त्याच्या डोक्याची थोडी जरी हालचाल झाली तरी हे परावर्तित किरण उद्गमापेक्षा वेगळ्या ठिकाणी पोचतात – परिणामी स्क्रीनवरील त्या बिंदूवर संगणकाचा कर्सर दाखवला जातो. स्क्रीनवर कीबोर्ड दर्शवला जात असल्यास त्यातून अक्षरे निवडून मजकूर तयार करता येतो तसेच मेन्यू- आणि टूलबारही चालवता येतात. ह्या परावर्तनाद्वारे 45 अंशांच्या कोनाइतके क्षेत्र व्यापले जात असल्याने डोक्याच्या विविध हालचालींनी आज्ञा देता येतात. तसेच सेकंदाला 100 तरंग प्रक्षेपित होत असल्यामुळे अचूकताही कायम राहते.

आयगेझ एज्

पारंपरिक अर्थाने अपंगच नव्हे तर पक्षाघाताचा (पॅरालिसिस ऊर्फ लकवा) तीव्र झटका आलेल्यांनाही अनेक दैनंदिन कामे करणे अवघड जाते. ज्यांच्या मानेखालील शरीराला अशा समस्या असतील त्यांना फक्त नजरेच्या इशार्‍यावर संगणक चालवणे शक्य झाले आहे ते आयगेझ एजसारख्या तंत्रप्रणालींमुळेच. ‘एलसी टेक्नॉलॉजीज्’ने बनवलेल्या ह्या यंत्रणेमध्ये हायस्पीड इन्फ्रारेड कॅमेर्‍याचा वापर केला जातो.

अशाच इतर प्रणालींप्रमाणेच हा कॅमेरा स्क्रीनवर बसवलेला असतो. हिचे काम चालवणारे प्रोसेसिंग युनिट, सेट-टॉप बॉक्सप्रमाणे, शेजारीच टेबलावर ठेवलेले असते.

सिस्टिमचे ‘कॅलिब्रेशन’ झाले की, संगणकाकडून काम करवण्यासाठी, वापरकर्त्याने स्क्रीनवर दाखवल्या जाणार्‍या की बोर्ड आणि माउसच्या प्रतिमेकडे फक्त बघायचे असते.

कोणत्या अक्षराकडे, माऊसच्या कोणत्या भागाकडे (राइट-क्लिक की लेफ्ट-क्लिक) वा आज्ञेकडे बघितले जात आहे हे समजून घेऊन, ठरावीक अल्पावधीनंतर ती आज्ञा संगणकाद्वारे पाळली जाते. याखेरीज वापरकर्ता तोंडी आज्ञाही देऊ शकतो.

हे साधण्यासाठी विशिष्ट शब्दसमूह ह्या यंत्रणेच्या ‘स्पीच सिंथसायझर’ मध्ये प्रोग्रॅम केलेले आहेत.

आपले अपंगत्व ही आपलीच काहीतरी चूक किंवा त्रुटी आहे आणि आपण फक्त इतरांवरचे निरुपयोगी ओझे बनलो आहोत ही भावना बहुतेक विकलांगांना आतून त्रास देत असते. निदान नवतंत्रज्ञानाशी परिचय करून घेतल्यामुळे आयुष्यात कसा व किती सकारात्मक फरक पडणे शक्य आहे हे जाणवले तर त्यांच्या मनाला नवी उभारी मिळेल.

Back to top button