Latest

Vaccine booster dose : भारतात प्रिकॉशनल डोस म्हणून ‘कॉर्बिव्हॅक्स’ची निवड शक्य

नंदू लटके

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाचा बूस्टर डोस (Vaccine booster dose ) ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटविरुद्ध 74 ते 94 टक्क्यांपर्यंत परिणामकारक ठरणार असल्याचा दावा इस्रायलमधील क्लॅलिट आरोग्य सेवा संंस्था, ब्रिटनमधील आरोग्य सुरक्षा संस्था, चीनमधील 'सिनोव्हॅक'ने केला आहे. इस्रायल, जपान, ब्रिटनसह जगभरातील 36 देशांमध्ये बूस्टर डोस दिला जात आहे. भारतात 'प्रिकॉशनल डोस' म्हणून 'कॉर्बिव्हॅक्स'ची निवड शक्य आहे.

भारतात 10 जानेवारीपासून सुरू होणार्‍या बूस्टर डोस (Vaccine booster dose ) वितरणात उच्च सल्लागार समितीच्या सूचनेनुसार ज्या कंपनीचे दोन डोस आधी घेतले आहेत, ती सोडून अन्य कंपनीचा डोस बूस्टर डोस म्हणून दिला जाणे शक्य आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेबरहुकूम 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचार्‍यांसह जवळपास तीन कोटी 'फ्रंटलाईन वर्कर्स'ना (कोरोना योद्ध्यांना) बूस्टर डोस (प्रिकॉशनल डोस) देण्यास सुरुवात होईल. साठ वर्षांवरील गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Vaccine booster dose : पंधराशे कोटी आगाऊ

हैदराबाद येथील 'बायोलॉजिकल ई' कंपनीची कॉर्बिव्हॅक्स ही लस तिसरा डोस म्हणून आघाडीवर आहे. केंद्र सरकारने या कंपनीला 1 हजार 500 कोटी रुपये आगाऊ दिलेले आहेत. कंपनी 30 कोडी डोस उपलब्ध करून देणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कॉर्बिव्हॅक्सला पुढील काही दिवसांत आपत्कालीन वापराची परवानगी मिळू शकते.

इस्रायलपासून सुरुवात

बूस्टर डोसची सुरुवात सर्वांत आधी इस्रायलमध्ये झाली. नंतर ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, नॉर्वे, जर्मनी, युरोपातील सर्व देशांसहअमेरिका, कॅनडा, जपान, चीन, तुर्कस्तानसारख्या देशांतही बूस्टर डोस देण्यात येत आहेत.

तिसर्‍या डोसबद्दल उत्सुकता

सल्लागार समितीची सूचना अमलात आणली तर दोन डोस कोव्हॅक्सिनचे घेतलेले आहेत, अशांना तिसरा डोस कोेव्हिशिल्डचा देण्यात येऊ शकेल. तिसरा डोस एखाद्या नव्या कंपनीचाही असण्याची शक्यता आहे. फायझर आणि मॉडर्ना या लस कंपन्यांनीही आपापल्या लसी ओमायक्रॉनविरुद्ध परिणामकारक असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT