Latest

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांचा बंगला उद्ध्वस्त; सोमय्यांची सेल्फी

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील अनधिकृत बंगला पाडल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी बंगल्याच्याच जागेवर जाऊन सपाट जागेसोबत सेल्फी घेतला आहे. हा सेल्फी प्रचंड व्हायरल होत आहे. या बंगल्याबाबत सोमय्या यांनी सीआरझेडच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याची तक्रार केली होती. सोमय्या यांनी बंगल्याचा फोटो आणि त्यानंतर बांधकाम पाडलेल्या जागेचा फोटो शेअर केला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तेथे शिवसेना आणि भाजप असा सामना रंगला आहे. किरीट सोमय्या यांच्या खासदारकीचे तिकीट कापण्यासाठी शिवसेनेने युती पणाला लावली होती.

त्यामुळे आक्रमक झालेल्या सोमय्यांनी शिवसेनेविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये ट्विटरवर मिलिंद नार्वेकर यांच्या अनधिकृत बंगल्याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल असे जाहीर केले होते.

दापोलीतील नार्वेकर यांचा बंगला अनधिकृत असून त्यांनी सीआरझेड नियमावलींचे उल्लंघन केले होते. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर नार्वेकर यांनी हा बंगला स्वत:हून काढून घेतला. हे बांधकाम उद्ध्वस्थ झाल्यानंतर तेथे आता सपाट जमीन दिसत आहे. तसेच बांधकामाचे अवशेष आहेत. या मोकळ्या जागेचा फोटो काढून बिफोर आणि आफ्टर असे अशा कॅप्शन देऊन त्यांनी तो शेअर केला आहे.

दापोली समुद्र किनाऱ्यावरील शिवसेना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा जमीनदोस्त झालेला बंगला पाहिला… असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. सोमय्या आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT