वेंगुर्ले : पर्सनेट मासेमारी करणारा गोव्यातील ट्रॉलर्स शिरोडा समुद्रात जेरबंद | पुढारी

वेंगुर्ले : पर्सनेट मासेमारी करणारा गोव्यातील ट्रॉलर्स शिरोडा समुद्रात जेरबंद

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा समुद्रात एल.ई.डी. लाईटद्वारे पर्सनेट मासेमारी करणारा गोव्यातील ट्रॉलर्स मत्स्य विभागाच्या पथकाने रविवारी पहाटे 4.30 वा.च्या सुमारांस रंगेहाथ पकडला. ट्रॉलर्सवर तांडेल व खलाशी असे एकूण 29 कामगार असून, पकडण्यात आलेल्या मासळीचा लिलाव 2 लाख 83 हजार रुपये एवढा झाला आहे. याप्रकरणी सोमवारी प्रथम बोट देवगड बंदरात हलविण्यात येईल आणि त्यानंतर मालवण येथील सहायक मत्स्य आयुक्‍तांकडे कारवाईसाठी हे प्रकरण सादर करण्यात येणार असल्याची माहिती वेंगुर्लेचे परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी दिली.

वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रात मोठ्या प्रमाणात एल. ई.डी. लाईटव्दारे पर्सनेट नौका मासमारी करत असल्याच्या मच्छीमारांच्या तक्रारीनुसार शासनाच्या शीतल या गस्ती नौकेद्वारे वेंगुर्लेचे मत्स्य परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी मालवणचे अंमलबाजावणी अधिकारी विजय देवकर, सागरी सुरक्षा रक्षक राजेश कुबल, हर्षद टाक्‍कर (दोन्ही वेंगुर्ले), शुभंम राऊळ, दिवाकर जुवाटकर (दोन्ही मालवण), तसेच शीतल गस्ती नौकेचे तांडेल संजय चिंदरकर व श्री. पाटील, कर्मचारी श्री. पडवळ, श्री. पेडणेकर व राजपुत या पथका समवेत शनिवारी रात्रीपासून वेंगुर्ले समुद्रात गस्त सुरू केली. पहाटे 4.30 वा.च्या सुमारास गोवा राज्यातील सी-लॉर्ड-आय.एन.डी जी.ए.-01-एम.एम.- 962 हा ट्रॉलर्स एल.ई.डी. लाईटच्या वापरातून पर्सनेटद्वारे मासेमारी करत असताना रंगेहाथ सापडला.

या ट्रॉलर्सला वेंगुर्लेत बंदरात आणण्यात आले. त्यावर खडकातील सापडलेली कोकर, तुमरस, कळवी यांसह विविध प्रकारच्या मासळीचा लिलाव करण्यांत आला. लिलावाची किंमत 2 लाख 83 हजार रुपये एवढी झाली आहे.

हेही वाचा

Back to top button