पुढारी ऑनलाईन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British PM Rishi Sunak) यांना धक्का बसला आहे. ब्रिटनमधील त्यांच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला पोटनिवडणुकीत दोन महत्त्वांच्या जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूक जिंकण्याच्या पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने संसदेतील मागील १२ पोटनिवडणुकांपैकी फक्त एकच जिंकली आहे.
संबंधित बातम्या
ब्रिटनमधील मुख्य विरोधी लेबर पक्षाने मिड बेडफोर्डशायरची (Mid Bedfordshire) जागा जिंकली आहे. लेबर पक्षाचे अॅलिस्टर स्ट्रॅथर्न आणि सारा एडवर्ड्स यांनी मिड बेडफोर्डशायर आणि टॅमवर्थच्या (Tamworth) जागांवर विजय मिळवला. त्यांनी अनुक्रमे सुमारे २५ हजार आणि २० हजारच्या फरकाने बहुमत मिळवले. १९३१ पासून मिड बेडफोर्डशायर आणि १९९६ पासून टॅमवर्थ जागेवर कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दबदबा राहिला आहे. या दोन्ही जागा कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सुरक्षित जागा होत्या. पण या जागा त्यांनी गमावल्या आहेत. तर मिड बेडफोर्डशायरची जागा जिंकणे हा लेबर पक्षाचा मोठा विजय मानला जात आहे.
या दुहेरी पराभवाने मागील चार राष्ट्रीय निवडणुका जिंकलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा प्रभाव कमी झाला असून आणि विरोधी लेबर पक्ष २०१० नंतर पहिल्यांदा पुन्हा सत्ता मिळवण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
लंडनच्या उत्तरेस सुमारे ५० मैल (८० किमी) क्षेत्र असलेल्या मिडबेडफोर्डशायरची जागा लेबरने मिळवली आहे. १९४५ नंतरच्या पोटनिवडणुकीत कंझर्व्हेटिव्हचा हा सर्वात मोठा पराभव मानला जात आहे.
नवीन नेतृत्वासाठी जनतेला दिलेला हा कौल असल्याचे लेबर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांनी म्हटले आहे. "हे अभूतपूर्व निकाल आहेत. टोरीजच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवणे हे दर्शविते की लोकांना मोठा बदल हवा आहे आणि त्यासाठी त्यांनी आमच्या बदललेल्या लेबर पक्षावर विश्वास ठेवण्याची तयारी दाखवली आहे," असे स्टारमर यांनी नमूद केले आहे.
कंझर्व्हेटिव्हच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही निवडणूक आमच्यासाठी अवघड होती. पण सरकारला सहसा मध्यावधी निवडणुका जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागतोच. (British PM Rishi Sunak)
माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या जवळच्या राजकीय नेत्यांनी राजीनामा दिल्याने मिडबेडफोर्डशायर आणि टॅमवर्थ येथे पोटनिवडणूक घेण्यात आली.
ब्रिटनमध्ये वाढती महागाई, मंदावलेली अर्थव्यवस्था आणि सरकारी आरोग्य सुविधा मिळवण्यात अडचणी येत असल्याने येथील लोक सरकावर रोष व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा :