अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा: नगर मनपा पोटनिवडणूक : महापालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे प्रदीप परदेशी यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश तिवारी यांचा ५१७ मतांनी पराभव केला.
मनपा पोटनिवडणूकीमध्येमनसेचे पोपट पाथरे पहिल्यापासून आघाडीवर होते. मात्र, त्यांची आघाडी पाचव्या फेरीनंतर तुटली. दरम्यान, मनसेच्या उमेदवाराने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे या प्रभागात शिवसेनेला पुन्हा पराभवाचा धक्का बसला.
शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी यांना २५८९, भाजपचे परदेशी यांना ३१०६ तर मनसेचे पोपट पाथरे यांना १७५१ मते पडली. मनसेचे पोपट पाथरे सुरुवातीपासून आघाडीवर होते. त्यांनी घेतलेल्या निर्णायक मतांमुळे शिवसेनेला पुन्हा फटका बसला. पाथरे यांच्यामुळे तिवारींना पराभवाची चव चाखावी लागली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याचे पद रद्द झाले होते. त्या जागेसाठी ही निवडणूक पार पडली. भाजपने ऐनवेळी उमेदवारी बदलून प्रदीप परदेशी यांना रिंगणात उतरवले होते.
हेही वाचलं का?