राधानगरी : पुढारी वृत्तसेवा
राधानगरी-दाजीपूर परिसरास राजर्षी शाहू महाराजांचा पदस्पर्श लाभला आहे. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या या परिसरामध्ये खास हत्तींसाठी शाहू महाराजांनी बांधलेला हत्तीमहाल इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या निसर्गसंपन्न क्षेत्राचे जतन-संवर्धन करणे आवश्यक आहे. या हेतूने दै.'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ व वन्यजीव विभागातर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी-दाजीपूर परिसरात दोन दिवसीय उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी राधानगरी वन्यजीव कार्यालय, ऐतिहासिक हत्तीमहाल, राधानगरी धरण स्वयंचलित दरवाजे, राऊतवाडी धबधबा, दाजीपूर परिसरातील उगवाईदेवी देवराई, राधानगरी धरण बॅकवॉटर परिसर, दाजीपूर वन्यजीव कार्यालय आदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
या उपक्रमात यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय, सोळांकूर, कर्मवीर हिरे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज-गारगोटी, भोगावती महाविद्यालय-कुरुकली, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय-मुरगूड येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाय, प्राचार्य डॉ. सूरत मांजरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनचे समन्वयक विक्रम रेपे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अतुल कांबळे, सुरेश दिवाण, डॉ. टी. एम. चौगुले, डॉ. आर. एन. तहसीलदार, डॉ. व्ही. ए. भोसले, डॉ. एस. पी. दोरुगडे, सुशांत पाटील उपस्थित होते. उपक्रमास विभागीय वन्यजीव अधिकारी विशाल माळी यांचे सहकार्य व कुलगुरू डी. टी. शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.
'वारसास्थळांना भेटी देताना जैवविविधता व निसर्गाचे आपण भान राखलेच पाहिजे ही काळाची गरज आहे,' हा संदेश उपक्रमादरम्यान युवा विद्यार्थ्यांनी स्वच्छतेतून दिला.
दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने 'हेरिटेज कोल्हापूर' उपक्रमांतर्गत राधानगरी-दाजीपूर परिसरातील शिवगड, दाजीपूर अभयारण्य, हत्तीमहाल, देवराई आदी माहितीपूर्ण चित्रफितींचा संग्रह करण्यात आला आहे. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना या चित्रफिती आवर्जून दाखवण्यात आल्या.
हे ही वाचा :