Latest

पुणे : ‘भय इथले संपत नाही’, बिबट्या पाठ सोडेना!

अमृता चौगुले

राजेंद्र खोमणे

नानगाव : दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यातील बागायती भागात मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे सध्या या भागातील बिबट्यांचे वास्तव्य समजल्या जाणार्‍या मोठ्या उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने बिबटे आपल्या बछड्यांसह सैरभैर झाले असून, अनेकदा नागरिक व शेतकर्‍यांना दर्शन देत आहेत. त्यामुळे आजही या भागात भीतीचे वातावरण असून, भय इथले संपत नाही, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

उसाच्या बागायती क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. दिवसेंदिवस बिबट्यांची वाढती संस्था नागरिक व शेतकर्‍यांची डोकेदुखी बनत चालली आहे. अनेकदा या भागातील शेतकर्‍यांच्या छोट्या-मोठ्या जनावरांवर हल्ले झाल्याने काही जनावरे ठार झाले असून काही जनावरे मृत्यू पावली आहेत. दिवसेंदिवस जनावरांवर होणारे हल्ले शेतकर्‍यांसाठी चिंतेची गोष्ट ठरत आहेत.

बछड्यांसह वास्तव्य

भीमा नदीच्या बागायती भागात मोठ्या प्रमाणावर असलेली उसाची शेती, मुबलक पाणी आणि भूक भागविण्यासाठी असलेली लहान-मोठी जनावरे यामुळे बिबट्यांनी या भागात आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. बिबट्याची मादीला एका वेळी दोन ते तीन पिल्लांना जन्म देत असते. ही पिल्ले मोठी होऊन शिकार करण्यासाठी बाजूला जातात, तेव्हा पुन्हा ही मादी दुसर्‍या पिल्लांना जन्म देण्यासाठी तयार असते. जवळपास दोन वर्षांच्या अंतरावर पिल्ले जन्माला येत असतात. त्यामुळे सध्या बछड्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे.

सध्या या भागातील मोठ्या उसाचा निवारा ऊसतोडीमुळे कमी होत चालला आहे. त्यामुळे बिबटे व बछडे शेतीभागात दिसून येत आहेत. या भागातील रानडुक्कर, कुत्री अशा जनावरांवरदेखील बिबटे हल्ले करीत आहेत. अशी शिकार मिळाली नाही, तर बिबटे शेतकर्‍यांच्या जनावरांपर्यंत पोहचून शिकार करीत आहेत.

शेतातील कामे सावधगिरीने करा

सध्या गव्हाच्या पेरण्या व कांद्याच्या लागणीचे काम वेगाने सुरू आहे. कांद्याची लागणी ही शेतात वाकून केली जाते तसेच शेतकरी पिकांना पाणीदेखील वाकनूच देत असतात. त्यामुळे बिबट्याच्या उंचीची आकृती तयार होते. अशावेळी बिबट्या हल्ला करू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतातील कामेदेखील सावधगिरीने करणे गरजेचे आहे.

''भीमा नदीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोडणीचे काम सुरू आहे. ऊसतोडणी कामगारांबरोबर त्यांची लहान मुलेदेखील असतात. त्यामुळे कामगारांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच, शेतकर्‍यांनी बंदोबस्त गोठ्यांचा अवलंब करणेदेखील आवश्यक आहे.''
                                                                                                                  – एन. पी. चव्हाण, वनरक्षक, दौंड वन विभाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT