जम्मू- काश्मीरमधील दोन चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद | पुढारी

जम्मू- काश्मीरमधील दोन चकमकीत ६ दहशतवाद्यांचा खात्मा, तर एक जवान शहीद

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन डेस्क

जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत ६ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. अनंतनागमधील चकमकीत जम्मू आणि काश्मीर पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी दिली आहे.

”कुलगाम येथील चकमकीत (Kulgam encounter) जैश-ए-मोहम्मद (JeM) चे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. त्यात एक पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान दोन एके ४७ आणि एक एम ४ रायफलदेखील जप्त केली आहे,” असे विजय कुमार यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

अनंतनाग येथे रात्री झालेल्या चकमकीत (Anantnag encounter) सुरुवातीला एक दहशतवादी ठार करण्यात आला आणि पहाटे दोघांचा खात्मा करण्यात आला. यावेळी तीन लष्करी जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलिस जखमी झाले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील एका जवान शहीद झाला. तर उर्वरित जखमी जवानांची प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले.

या चकमकीत एकूण दोन पाकिस्तानी दहशतवादी आणि चार स्थानिक दहशतवादी ठार झाले आहेत. हे ‘जैश-ए- मोहम्मद’ दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यांच्याकडून दोन एम४ आणि चार एके ४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत. ही सुरक्षा दलाची मोठी कामगिरी असल्याचे आयजीपी विजय कुमार यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : जुगाडू जीप करणारे लोहार कुटुंब महिंद्रांची ऑफर स्वीकारणार का? | Kick Start Jeep

Back to top button