

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी आरोपपत्र दाखल केले. त्यांचे पुत्र ऋषिकेश आणि सलील देशमुख यांचीही नावे या आरोपपत्रात आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडी मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. ईडीने देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहायक कुंदन शिंदे यांना अटक केली. त्यानंतर देशमुखांच्या 4 कोटी 70 लाखांच्या मालमत्तेवर टाच आणत पहिले आरोपपत्र दाखल केले होते.
देशमुख यांना अटक केल्यानंतर केलेल्या तपासाच्या आधारे बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्र 7 हजार पानांचे आहे. या आरोपपत्रात देशमुख यांच्या जबाबासह माजी सचिव सीताराम कुंटे, उपसचिव कैलाश गायकवाड, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, 12 पोलीस अधिकारी आणि अन्य व्यक्ती, साक्षीदार यांच्या जबाबाचा समावेश आहे.