Latest

Navneet Rana : ‘राणा दाम्पत्याकडून रचला जात होता सरकार पाडण्याचा कट’

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या राणा दाम्पत्यांच्या (Navneet Rana) जामीन याचिकेवर शनिवारी सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निर्णय सोमवारी पर्यंत राखून ठेवला. सोमवारी (दि.२) राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर निर्णय येण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी, राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा प्रकरणाद्वारे राज्यातील सरकार पाडण्याचा कट रचला जात होता, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकीलांनी करत राणा दाम्पत्यांच्या जामीनाला विरोध केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister uddhav thackeray) यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा वाचण्याच्या घोषणेनंतर बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली आमदार रवी राणा (ravi rana) व खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती आणि दोघेही एका आठवड्यापेक्षा जास्त काळापासून तुरुंगात आहेत. खासदाराच्या जामीन अर्जाला महाराष्ट्र सरकारने कडाडून विरोध करण्यात आला आहे. राज्य सरकार पाडण्याचे षडयंत्र खासदाराच्या वतीने रचले जात असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. सरकार पडावे, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा खासदाराचा हेतू असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय राणा दाम्पत्य तुरुंगातून बाहेर आल्यास पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात असा दावा यावेळी करण्यात आला.

हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी सरकार आहे आणि त्यांना ही साडेसाती संपवायची आहे, असे दोन्ही आरोपींनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, असे वकिलाच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले. त्यातून हे स्पष्ट होते की हे सरकारला हटवण्याचे काम करत होते. या पती-पत्नीवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. आम्ही आमच्या उत्तरात या गुन्हेगारी घटनांचाही उल्लेख केला आहे. आमदार रवी राणा यांच्यावर १७ गुन्हे तर खा. नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर ६ गुन्हे दाखल आहेत. तसेच या गुन्ह्यांसह त्यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल आहे असल्याचे सरकारी वकीलांनी निदर्शनास आणून दिले.

त्याचवेळी आरोपी पक्षाचे वकील आबाद पोंडा यांनी सांगितले की, आमच्या अशिलाचा हेतू कोणत्याही प्रकारे हिंसाचार करण्याचा नव्हता. आम्ही फक्त प्रार्थना करणार होतो. तसेच लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचा म्हणणार असल्याचे रिमांडमध्ये अथवा जबाबात कुठेही नमूद नाही. आम्ही तिथे शांततेने पठण करणार होतो. आम्ही समर्थकांनाही बोलावले नाही, म्हणजे जमाव बोलावला नाही. आमचा हिंसाचाराचा कोणताही हेतू नव्हता. आम्ही हनुमान चालिसा वाचणार होतो. आम्ही कोणत्याही मशिदीसमोरून जात नव्हतो. तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पठण करणार होतो. जे स्वत: हिंदू व हिदूत्ववादी नेते आहेत, तर हा देशद्रोह कसा होतो? आणि हे सरकार कसे धोक्यात आणू शकतो ?

राणा (Navneet Rana) यांचे वकील पुढे म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था ढासळली हे खरे पण ते कार्यकर्त्यांच्या बाजूने. लंडन ब्रिजवर हनुमान चालीसाचे पठण केले जाते, तर मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केला तर तो गुन्हा ठरतो. सीआरपीसीच्या कलम १४९ च्या सूचनेचे पालन न केल्याबद्दल देशद्रोहाचे कलम कसे लागू शकते ? शिवाय त्याच दिवशी दुपारी ३.४० वाजता राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली होती.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल सोमवार पर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला पुन्हा कोठडी मिळणार की जामीन याचा फैसला सोमवारी होणार आहे. दुसरीकडे नवनीत राणा यांची तब्येत बरी नसल्यानं त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात यावं अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केलीय. राणा यांना नीट अन्न आणि उपचार मिळत नसल्याचा दावा वकिलांनी केलाय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT