परिते (ता. करवीर) गावाजवळ बुधवारी रात्री दिसलेला बिबट्या शुक्रवारी सकाळी वैरण आणण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दिसल्याने भिती वाढली आहे. त्यामुळे भोगावती परिसर भितीच्या छायेखाली असून बिबट्याचा या परिसरात वास्तव्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनखात्याचे रेस्क्यू पथक पुन्हा परिते येथे येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Kolhapur Leopard)
भोगावती ते कोल्हापूर रस्ता ओलांडून डोंगराकडे गेलेला बिबट्या त्याच परिसरात असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. कारण काल सकाळी ढेरे यांच्या शेताकडे वैरणीसाठी दिगंबर सुतार (रा. परिते) हे गेले होते. त्यावेळी खणी शेजारील ऊसाच्या शेतात कडेच्या सरीत हा बिबट्या बसला असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे ते सरळ घराकडे परतले आहेत.
तसेच त्या भागातील शेतकरी बी. के. डोंगळे (रा. घोटवडे) यांच्या शेततळ्यातील प्लास्टिक काळ्या कागदावर बिबट्याच्या पायाचे अनेक ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे दोन दिवस बिबट्याचे या परिसरात वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले असून गावामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
तर बहुतांश शेतकऱ्यांचे जनावरांचे गोठे गावाबाहेर असल्याने त्यांची अडचण झाली आहे. जनावरांच्या धारा काढण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याने वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.