Tikri Border Accident : आता भरधाव डंपरने तीन शेतकरी महिला आंदोलकांना चिरडले | पुढारी

Tikri Border Accident : आता भरधाव डंपरने तीन शेतकरी महिला आंदोलकांना चिरडले

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

शेती सुधारणा कायद्याविरोधात राजधानी लगतच्या टिकरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या तीन महिला आंदोलकांना भरधाव डंपरने चिरडले. गुरूवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास टिकरी बॉर्डरवरील पकोडा चौकात घडलेल्या या अपघातामुळे आंदोलनस्थळी शोककळा पसरली. (Tikri Border Accident)

छिंदर कौर भान सिंग (६० वर्ष), अमरजीत कौर हरजीत सिंग (५८ वर्ष), गुरमेल कौर भोला सिंग (६० वर्ष) असे मृतक महिला आंदोलकांची नावे आहेत. अपघातात जखमी इतर तीन महिलांची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Tikri Border Accident : सहा जणांना डंपरने उडवले

मृतक महिला पंजाब मधील मानसाच्या खिवा दयालवाला गावातील रहिवासी आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिला झज्जर रोड उड्डाणपुलाजवळील बायपास जवळ राहत होत्या. निर्धारित कालावधीत येथे मुक्काम करून त्या पंजाबला जाण्यासाठी बहादूरगड रेल्वे स्थानक गाठण्याकरिता ऑटोची वाट बघत रस्तादुभाजकारवर बसल्या होत्या.

दरम्यान झज्जरकडून येणाऱ्या मातीने भरलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. यातील दोन महिलांचा घटनास्थळीचा मृत्यू झाला. तर, गंभीरअवस्थेत असलेल्या एका महिलेचा रूग्णालयात मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. घटनेनंतर चालकाने डंपर सोडून पळ काढला.

या घटनेवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने आपली जिद्द सोडून शेतकर्यांच्या मागण्या मान्य केल्या असता, तर शेतकर्यांच्या कुटुंबियांना रस्त्यावर बसण्याची आवश्यकताच पडली नसती, अशा शब्दात केजरीवाल यांनी केंद्रावर टीका केली. सरकारने शेतकर्यांच्या मागण्या मान्य केल्या तर अशाप्रकारच्या दु:खद घटना घडणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Back to top button