Khadse's hospitality at the office of BJP office bearers 
Latest

भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी खडसेंचा पाहुणचार, चर्चेला उधाण

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या कार्यालयाचे उद्घाटन, युवा, महिला व ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची भेट, त्याचबरोबर थेट भाजप पदाधिकार्‍यांच्या घरी भेट देऊन राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारण ढवळले.

विशेष म्हणजे त्यांच्या सोशल अकाउंटवर याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि त्यावर 'राष्ट्रवादी पुन्हा' अशा कमेंट पडल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले.

खडसे हे एक दिवसाच्या दौर्‍यासाठी शहरात आले होते. त्यांनी राष्ट्रवादी पदाधिकारी व नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

तसेच, त्यांनी भाजपचे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांची शाहूनगर येथील निवासस्थानी जाऊन आवर्जून भेट घेतली. पवार यांनी सहकुटुंब त्यांचे स्वागत केले.

या वेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते. तेथे त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पक्षनेते नामदेव ढाके यांची वाल्हेकरवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली.

खडसे यांच्या या भेटीमुळे शहरात राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असून, त्यासंदर्भात या भेटीत गुप्त चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

त्याबाबत सोशल मीडियावर छायाचित्रे झळकली. त्यामुळे शहर भाजपमध्ये खळबळ माजली आहे. गोंधळलेल्या भाजपला खुलासा करून त्याचे खंडन करण्याची वेळ आली.

राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी ओबीसी महिला आघाडी शहराध्यक्षा सारिका पवार यांच्या चिखलीतील घरी भेट दिली. तसेच, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या नवी सांगवीतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष तानाजी जवळकर यांच्या पिंपळे गुरवमधील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. देहूचे नगरसेवक योगेश काळोखे यांच्या घरी भेट दिली. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

निवडणुकीचा फिवर अन् खडसेंचा गिअर

त्रिसदस्यीस प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. बंडखोरीच्या चर्चा झडत आहेत.

भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे जुनी चर्चा आहे. खडसेंची भेट राजकीय नसल्याचा खुलासा भाजप पदाधिकार्‍यांनी केला असला तरी, पक्षांतराच्या जुन्या चर्चेला उत आले.

राष्ट्रवादीचा भ्रमाचा भोपळा : नामदेव ढाके

भाजपतून 20 ते 22 नगरसेवक बाहेर पडतील, हा राष्ट्रवादीचा दावा खोटा ठरणार आहे. उलट, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत.

गेली 30 वर्षे शहरात भाजपची मूल्ये रुजवण्यासाठी आम्ही संघर्ष केला आहे. त्यामुळे आम्ही पक्षासोबत आहोत, राष्ट्रवादीने आपले नगरसेवक सांभाळावेत, असे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने केवळ स्वप्ने पाहावीत : पवार

एकनाथ खडसे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आम्ही भाजपच्या पक्ष संघटनेत काम करीत आहोत. त्यामुळे खडसे यांच्यासोबत कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे.

खडसे माझ्या घरी भेट देणार आहेत, ही बाब मी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना कितीही उकळ्या फुटत असल्या, तरी त्यांचा भ्रमनिरास होईल, असे माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

खंडणीखोर भाजपने आम्हाला शिकवू नये : शहराध्यक्ष संजोग वाघेरे

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांची नेते अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे.

येत्या काही दिवसांत ते प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नगरसेवकांची भेट घेतली.

तसेच, ते भाजपच्या काही नगरसेवकांना भेटले. भ्रष्टाचार व खंडणीखोर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आम्ही काय करावे हे शिकवू नये. त्या भानगडीत पडू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT