आंतरराष्ट्रीय

US Iran war | इराणने २४ तासांच्या आत केली होर्मुजची सामुद्रधुनी बंद ! अमेरिकेने युद्धबंदीचा करार मोडल्‍याचा आरोप

US Iran war | इराणने आपले हवाई क्षेत्र केले अंशतः खुले

पुढारी वृत्तसेवा

Iran Shuts Strait of Hormuz Again

तेहरान/वॉशिंग्टन: इराणने पुन्हा एकदा होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद केली आहे. काल शुक्रवारी इराणने हा मार्ग खुला करण्याची घोषणा केली होती, परंतु आता पुन्हा या सागरी मार्गावर निर्बंध लादण्यात आल्‍याचे वृत्त 'अल जजीरा'ने दिले आहे. अमेरिकेने युद्धबंदीचा (सीझफायर) करार मोडल्याचा आरोप करत, आता होर्मुजमधील जहाजांची ये-जा पूर्णपणे लष्कराच्या नियंत्रणाखाली असेल, असे इराणने स्‍पष्‍ट केले आहे.

होर्मुज सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा तणाव वाढला

होर्मुज सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इराणने होर्मुजची सामुद्रधुनी मार्गावर कडक नियंत्रण लागू करत जहाजांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, होर्मुज सामुद्रधुनी आता पूर्णपणे सशस्त्र दलांच्या ताब्यात असून त्याचे व्यवस्थापन कडकपणे केले जात आहे. इराण अण्वस्त्र कार्यक्रमासह इतर मुद्द्यांवर वॉशिंग्टनसोबत करार करत नाही, तोपर्यंत अमेरिकेचा वेढा पूर्ण ताकदीने सुरूच राहील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. यनंतर काही तासांतच इराणने हा निर्णय घेतला आहे.

'करार न झाल्यास पुन्हा हल्‍ला करू' : ट्रम्प यांचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, पुढच्या आठवड्यात युद्धविराम संपण्यापूर्वी कोणताही करार झाला नाही, तर इराणवरील हल्ले पुन्हा सुरू होऊ शकतात. तसेच, होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी देखील कायम राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. इराणने व्यापारी जहाजांसाठी हा मार्ग पूर्णपणे खुला केल्याचे जाहीर केले होते, परंतु अमेरिकेच्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून तो पुन्हा बंद करण्याची चेतावणीही दिली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली.

अमेरिका, इस्रायल संबंधित नेटवर्क उद्ध्वस्त : इराणाचा दावा

इराणने अमेरिका, इस्रायल आणि ब्रिटनशी संबंधित अनेक कथित नेटवर्कचा पर्दाफाश करून ते उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स च्या गुप्तचर विभागाने ही माहिती दिली आहे. हे नेटवर्क हेरगिरीच्या कारवायांमध्ये गुंतले होते आणि देशात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत होते.

इराणने पूर्व हवाई क्षेत्राचा भाग खुला केला

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपले हवाई क्षेत्र अंशतः खुले करण्यास सुरुवात केली आहे. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने देशाच्या पूर्व भागात विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे. विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग सुरू केले असून हवाई सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे हे संकेत आहेत. अलीकडील संघर्षामुळे इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तज्ज्ञांच्या मते, टप्प्याटप्प्याने संपूर्ण हवाई क्षेत्र सुरू करण्यापूर्वी पूर्व भाग खुला करणे हे एक धोरणात्मक पाऊल आहे.

इस्रायलला सुरक्षा नको तर जमीन हवी आहे: तुर्किये

तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी इस्रायलवर सुरक्षेच्या नावाखाली जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. 'अंटाल्या डिप्लोमेसी फोरम'मध्ये बोलताना ते म्हणाले की, "इस्रायलला स्वतःची सुरक्षा नको, तर अधिक जमीन हवी आहे. नेतन्याहू सरकार सुरक्षेचा केवळ बहाणा म्हणून वापर करत आहे." दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धबंदी झाली असली तरी, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्त्राईल काट्झ यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचे सैन्य दक्षिण लेबनॉनमधील सर्वव्याप्त ठिकाणांवर तैनात राहील. हिजबुल्लाला कोणत्याही परिस्थितीत नि:शस्त्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT