

ट्रम्प यांनी इराणला कराराच्या अटींची आठवण करून देताना सांगितले की, 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पूर्णपणे खुली राहील आणि इराण कोणत्याही अण्वस्त्रांची निर्मिती करणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे.
Donald Trump Iran warning
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमध्ये सध्या दोन आठवड्यांचा युद्धविराम सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. ९) इराणला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. दोन्ही देशांमध्ये अंतिम आणि ठोस करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे लष्करी बळ इराणच्या सीमांनजीक तैनात राहील. तोपर्यंत आमचे सैन्य माघारी फिरणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. हा करार यशस्वी झाला नाही, तर इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "अमेरिकेची सर्व युद्धनौका, विमाने, लष्करी कर्मचारी आणि अतिरिक्त दारूगोळा इराणच्या आसपास तैनात राहतील. आधीच खिळखिळ्या झालेल्या शत्रूचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री सज्ज ठेवली जाईल. जोपर्यंत खऱ्या अर्थाने झालेला करार पूर्णपणे अंमलात येत नाही, तोपर्यंत आमचे सैन्य माघारी फिरणार नाही."
ट्रम्प यांनी इराणला कराराच्या अटींची आठवण करून देताना सांगितले की, 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पूर्णपणे खुली राहील आणि इराण कोणत्याही अण्वस्त्रांची निर्मिती करणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास इराणला "कधीही न पाहिलेल्या" भीषण हल्ल्याचा सामना करावा लागेल. काही कारणास्तव अंतिम करार झाला नाही, तर मग 'गोळीबार' सुरू होईल. जो यापूर्वी कधीही पाहिला नसेल इतका मोठा आणि शक्तिशाली असेल," असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला असला, तरी मध्यपूर्वेतील परिस्थिती अजूनही स्फोटक आहे. अमेरिका-इराण करार झाल्यानंतर काही वेळातच इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केले की, इराणसोबतच्या युद्धविरामात हिजबुल्लाहचा समावेश नाही. त्यामुळे हिजबुल्लाहविरुद्धची लष्करी कारवाई सुरूच राहील. बुधवारपासून झालेल्या या हल्ल्यात आतापर्यंत २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांमुळे आता 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जगातील महत्त्वाचा ऊर्जा मार्ग असलेली ही सामुद्रधुनी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमुळे इराणने हा जलमार्ग बंद केल्याचे वृत्त आहे. इराणच्या मते इस्रायलचे हे हल्ले अमेरिकेसोबत झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन आहेत. त्यामुळे आगामी काळात या भागातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.