व्‍हाईट हाऊस बाहेर झालेल्‍या गोळीबाराच्‍या घटनेची माहिती माध्‍यमांना देताना राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प 
आंतरराष्ट्रीय

Donald Trump : शॉटगन-चाकूंसह सज्ज असलेला तो एक 'लोन वुल्फ' : गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा

WHCA Dinner Shooting 2026 : हल्लेखोराकडून सुरक्षा रक्षकावर गोळीबार

पुढारी वृत्तसेवा

WHCA Dinner Shooting 2026

वॉशिंग्टन: 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या (WHCA) कार्यक्रमात गोळीबार करणारा संशयित अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होता. हल्लेखोराच्या निशाण्यावर मीच होतो, असे मला वाटते. अद्याप हल्ल्याच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. २६) माध्यमांशी बोलताना दिली. गोळी लागलेला अधिकारी आता धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

हल्लेखोर ५० यार्ड अंतरावरून धावत आला

शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन येथील बॉलरूमबाहेर ही घटना घडली. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वार्षिक मेजवानीसाठी उपस्थित होते. या धक्कादायक प्रसंगाबाबत माहिती देताना ट्रम्प यांनी सांगितले की, हल्लेखोर ५० यार्ड अंतरावरून धावत आला होता, परंतु मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत (बॉलरूम) पोहोचण्यापूर्वीच त्याला रोखण्यात आले. "ती खोली पूर्णपणे सुरक्षित होती," असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की संशयित कधीही त्या मुख्य हॉलमध्ये शिरला नाही जिथे ट्रम्प, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि शेकडो पत्रकार जमले होते.

सुरक्षा रक्षक बचावला, हल्लेखोर ताब्यात

सुरक्षा तपासणी नाक्यावर अनेक शस्त्रांसह घुसून त्याने सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळीबार केला, ज्यामुळे या हाय-प्रोफाइल कार्यक्रमात मोठी खळबळ उडाली. बुलेटप्रूफ जॅकेटमुळे तो एजंट बचावला असून कॅलिफोर्नियातील रहिवासी असलेल्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या मते, ही घटना एकाच व्यक्तीने घडवून आणली असावी, या हल्ल्याचा उद्देश आणि लक्ष्याबाबत तपास सुरू आहे.

व्यत्यय येऊनही कार्यक्रम सुरू राहावा अशी आपली इच्छा होती

गोळीबाराचा आवाज आल्यानंतरच्या क्षणांचे वर्णन करताना ट्रम्प म्हणाले की, परिस्थिती अत्यंत वेगाने बदलली. "मी काय घडतेय ते पाहत होतो... कदाचित मी अजून वेगाने खाली वाकायला हवे होते," असे सांगताना त्यांनी प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी त्वरित प्रतिसाद दिल्याचे नमूद केले. व्यत्यय येऊनही कार्यक्रम सुरू राहावा अशी आपली इच्छा होती, असे ट्रम्प यांनी सांगितले. "मी तिथेच थांबण्यासाठी खूप प्रयत्न केले," परंतु सुरक्षा नियमांनुसार तिथून बाहेर पडणे आवश्यक होते. हा कार्यक्रम पुढील ३० दिवसांत पुन्हा आयोजित केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

एजंटवर गोळीबार, जॅकेटमुळे वाचले प्राण

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, सिक्रेट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्यावर अत्यंत जवळून गोळी झाडण्यात आली, परंतु बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले. "एका अधिकाऱ्याला गोळी लागली, पण तो आता ठीक आहे. जॅकेटने त्याचे रक्षण केले." दरम्यान, एफबीआय (FBI) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली, त्याच्या सुरक्षा कवचाला लागल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही.

हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा रहिवासी

हल्लेखोर कॅलिफोर्नियाचा असून त्याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी आरोपीची ओळख कोल टॉमस ॲलन (वय ३१, रा. टॉरेन्स) अशी पटवली आहे. शनिवारी रात्री कार्यक्रमस्थळावरून सुरक्षित स्थळी हलवल्यानंतर सुमारे एका तासाने ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट केले होते की, "हल्लेखोराला पकडण्यात आले आहे."

हल्लेखोर एक मानसिक आजारी व्यक्ती : ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी या हल्लेखोराला "एक मानसिक आजारी व्यक्ती" असे संबोधले असून तो एकटाच असावा, असे प्राथमिक संकेत मिळत असल्याचे सांगितले. सार्वजनिक पदावर असताना असणाऱ्या जोखमीबद्दल बोलताना ते म्हणाले, "हा एक धोकादायक व्यवसाय आहे, परंतु या घटनेमुळे आपल्या कार्यपद्धतीत बदल होणार नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले. अखेरीस, त्यांनी राष्ट्रीय एकतेचे आवाहन करत, "रिपब्लिकन, डेमोक्रॅट्स आणि अपक्ष या सर्वांनी आपले मतभेद संपुष्टात आणावेत," असे आवाहनही त्यांनी केले.

लक्ष्य कोण होते?

"तुम्हीच या हल्ल्याचे लक्ष्य होतात का?" असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, "मला तसे वाटते." तपासकर्ते अद्याप हल्ल्याच्या कारणांचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ स्टेजवरून बाजूला नेण्यात आले होते. तसेच उपराष्ट्राध्यक्ष जेडी वान्स, परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सुरक्षितपणे बाहेर काढले गेले.

तपास सुरू, सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

कार्यवाहू अटर्नी जनरल टॉड ब्लँचे यांनी सांगितले की, तपास सुरू असून लवकरच गुन्हे दाखल केले जातील. एफबीआयचे दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. एफबीआय संचालक काश पटेल यांनी माहिती दिली की, बॅलिस्टिक पुरावे, शस्त्रे आणि पुंगळ्यांची तपासणी सुरू असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. शांततेचे आवाहन करताना ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना आपले मतभेद शांततेने सोडवण्याचे आवाहन केले. त्याच वेळी, त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. ती इमारत सुरक्षित नसल्याचे सांगत त्यांनी अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी अधिक प्रगत सुरक्षा व्यवस्था असण्याची गरज अधोरेखित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT