प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Meta Microsoft AI Layoff | गुंतवणूक AI मध्ये, कपात रोजगारामध्ये! 92,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळणार

एआय (AI) स्पर्धेमुळे बड्या तंत्रज्ञान कंपन्यांवर प्रचंड दबाव; खर्चात कपातीसाठी केली जाणार नोकरकपात

पुढारी वृत्तसेवा

Meta Microsoft AI Layoff

वॉशिंग्टन : मागील वर्षभरात जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात 'एआय'चा (AI) प्रचंड बोलबाला आहे. एआयमधील वाढत्या स्पर्धेने जगातील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी कंपन्या अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत. मात्र, यामुळे वाढणारा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्यांनी आता कर्मचाऱ्यांच्या कपातीचा मार्ग अवलंबला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि मेटा यांसारख्या दिग्गज कंपन्यांसह अनेक स्टार्टअप्सही आता खर्चात कपात करण्यासाठी सरसावले असल्याचे वृत्त 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने दिले आहे.

दिग्गज कंपन्यांची एआयमध्ये मोठी गुंतवणूक

ओपनएआयसह (OpenAI) अनेक नवीन कंपन्या कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मायक्रोसॉफ्टने स्पष्ट संकेत दिले आहेत की, एआय प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी ते खर्चात कपात सुरूच ठेवतील. तर मेटाने एआयला आपली सर्वोच्च प्राथमिकता ठरवले आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉन, गूगल, टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्याही एआयमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.

९२ हजार जणांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार

तंत्रज्ञान क्षेत्रातील 'Layoffs.fyi' या वेबसाइटनुसार, या वर्षात आतापर्यंत ९८ कंपन्यांनी ९२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

दिग्‍गज कंपन्‍यांनी घेतलेली भूमिका

मायक्रोसॉफ्ट : अमेरिकेतील ७ टक्के कर्मचाऱ्यांना, विशेषतः वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्तीची (Retirement) ऑफर दिली आहे.

मेटा : आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के (सुमारे ८ हजार) कर्मचारी कमी करण्याची घोषणा केली आहे.

अ‍ॅमेझॉन आणि गूगल : अ‍ॅमेझॉन अँथ्रोपिकमध्ये २.३५ लाख कोटी रुपये, तर गूगल ३.७६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

टेस्ला आणि स्पेसएक्स : टेस्ला यावर्षी एआयवर २.३५ लाख कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता आहे. तसेच इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने एआय स्टार्टअप 'कर्सर'सोबत करार केला आहे.

'ओपनएआय'ने डेटा सेंटर उभारण्यास लावला ब्रेक

ओपनएआयने आपला अत्यंत खर्चिक 'इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट'चा विचार बदलला आहे. कंपनीने स्वतःचे डेटा सेंटर उभारण्याची योजना तूर्तास रद्द केली असून, त्याऐवजी आता अस्तित्वात असलेल्या क्लाउड कंपन्यांकडून सर्व्हर भाड्याने घेतले जाणार आहेत. यामुळे कंपनीला तब्बल ५६ लाख कोटी रुपये खर्च करावे लागू शकतात.

एआय क्षेत्रात तीव्र स्पर्धा

दुसरीकडे, एआय क्षेत्रातील स्पर्धा अधिकच तीव्र होत आहे. 'अँथ्रोपिक' (Anthropic) सारख्या प्रतिस्पर्ध्यांनी आपली तांत्रिक क्षमता वाढवली आहे. त्यांच्या 'क्लॉड मायथोस' या मॉडेलमुळे तांत्रिक दबाव वाढला आहे. त्याला उत्तर म्हणून ओपनएआयने 'जीपीटी-५.५' (GPT-5.5) सादर केले आहे; परंतु या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते याची क्षमता अजूनही अपेक्षित स्तरावर नाही. दरम्यान, चिनी एआय कंपनी 'डीपसीक'नेही (DeepSeek) नवीन ओपन-सोर्स मॉडेल आणण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता केवळ तंत्रज्ञानाची राहिली नसून भांडवल, कौशल्य आणि शाश्वत बिझनेस मॉडेलची लढाई बनली आहे.

नवीन टूल्समुळे खर्चात वाढ, अन्य खर्चात करावी लागत आहे कपात

एआय कंपन्यांना त्यांच्या टूल्सचे यशच आता महाग पडू लागले आहे. ओपनएआय आणि अँथ्रोपिकने वापरकर्त्यांची कामे पूर्ण करणाऱ्या 'एजंट टूल्स'वर भर दिला आहे. या टूल्समुळे नवीन ग्राहक तर मिळत आहेत, मात्र त्यांच्या वापरासाठी प्रचंड 'कंप्युटिंग पॉवर' लागते. हा वाढता खर्च पेलण्यासाठी कंपन्यांना इतर विभागांतील खर्चात कपात करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT