Agentic AI Revolution | ‘एजेंटिक एआय’ची नवक्रांती

Agentic AI Revolution |
Agentic AI Revolution | ‘एजेंटिक एआय’ची नवक्रांती
Published on
Updated on

महेश कोळी, संगणक अभियंता

गेल्या काही वर्षांत आपण चॅटजीपीटीसारख्या ‘जनरेटिव्ह एआय’ टूल्सचा वापर करायला शिकलो आहोत; मात्र आता तंत्रज्ञानविश्व ‘एजेंटिक एआय’ किंवा ‘एआय एजंटस्’च्या दिशेने वेगाने सरकत आहे. हे अत्याधुनिक टूल म्हणजे वापरकर्त्यांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यापलीकडे जात स्वतःहून विचार करून कृती करणारे एक स्वायत्त तंत्रज्ञान आहे. म्हणजेच समजा तुम्हाला सुट्टीवर जायचे असेल, तर एजेंटिक एआय विमानाची तिकिटे शोधून, तुमच्या बजेटनुसार हॉटेल निवडून तुमच्या वतीने पेमेंट करून बुकिंगदेखील पूर्ण करू शकेल. ‘अ‍ॅनालिटिक्स इंडिया’ मॅगझीनच्या ताज्या विश्लेषणानुसार, एजंटिक एआय सॉफ्टवेअरमध्ये इंजिनिअरिंगचे भविष्य कायमचे बदलून टाकण्याची क्षमता आहे.

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात गेल्या काही दशकांपासून अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला साध्या मजकूर संपादनापासून ते क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि आताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे; मात्र सध्या ज्या बदलाची सर्वाधिक चर्चा होत आहे, तो बदल म्हणजे ‘एजेंटिक एआय’. हे केवळ एक नवीन टूल नसून सॉफ्टवेअर विकसित करण्याच्या संपूर्ण पद्धतीमध्ये होणारा एक मूलभूत बदल आहे. ‘अ‍ॅनालिटिक्स इंडिया’ मॅगझीनच्या ताज्या विश्लेषणानुसार, एजंटिक एआय सॉफ्टवेअरमध्ये इंजिनीअरिंगचे भविष्य कायमचे बदलून टाकण्याची क्षमता आहे.

एजंटिक एआय म्हणजे नेमके काय?

आतापर्यंत आपण वापरलेले चॅटजीपीटी किंवा गिटहब कोपायलट हे एआय टूल्स प्रामुख्याने मानवी निर्देशांवर अवलंबून होते. तुम्ही त्यांना एखादी आज्ञा दिली की ते त्याचे उत्तर देत असत. याला आपण ‘रिएक्टिव्ह एआय’ म्हणू शकतो. मात्र, ‘एजेंटिक एआय’ याच्या पुढचे पाऊल आहे. यात एआयमध्ये ‘एजन्सी’ असते. म्हणजेच ते स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकते. ते केवळ तुमच्या आज्ञेची वाट पाहत नाही, तर तुमचे ध्येय समजून घेऊन, त्यासाठी लागणारी प्रक्रिया ते स्वतः ठरवते, अंमलबजावणी करते आणि पुढील प्रगतीवर लक्ष ठेवून आवश्यक बदलही करते. थोडक्यात, स्वतःहून विचार करून काम पूर्ण करू शकणार्‍या एखाद्या डेव्हलपरप्रमाणे याची कार्यपद्धती आहे.

पारंपारिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रक्रियेत विश्लेषण, डिझाईन, कोडिंग, टेस्टिंग आणि डिप्लॉयमेंट असे टप्पे असतात. एजेंटिक एआय या सर्व टप्प्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. डिझाईनच्या स्तरावर हे एजंटस् सिस्टीम आर्किटेक्चरचे विश्लेषण करून अधिक कार्यक्षम पर्याय सुचवू शकतात. कोडिंगच्या बाबतीत हे केवळ कोड लिहिण्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण रिपॉझिटरी समजून घेऊन नवीन फिचर्स जोडणे किंवा जुन्या कोडमध्ये सुधारणा करणे यासारखी जटिल कामे करू शकतात. यामुळे डेव्हलपर्सचा जो वेळ कंटाळवाण्या कामांमध्ये जात असे, तो आता वाचणार आहे.

टेस्टिंग आणि डी-बगिंगमधील क्रांती

सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील सर्वात आव्हानात्मक आणि वेळखाऊ भाग म्हणजे टेस्टिंग आणि डी-बगिंग. एजेंटिक एआय यामध्ये गेमचेंजर ठरणार आहे. हे एजंटस् टेस्ट केसेस लिहिण्याबरोबरच स्वतः कोड रन करून एरर्स शोधू शकतात. एखादा एरर सापडल्यास तो का आला, याचे विश्लेषण करून तो सुधारण्यासाठी पॅच तयार करणे आणि पुन्हा टेस्ट करून सर्व काही सुरळीत असल्याची खात्री करणे, हे सर्व मानवी हस्तक्षेपाशिवाय शक्य होणार आहे. यामुळे सॉफ्टवेअर रीलिज सायकलचा वेग प्रचंड वाढणार असून चुकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल.

डेव्हलपर्सच्या भूमिकेत होणारे बदल

अनेकांना असा प्रश्न पडतो की, एआय सर्व कामे करू लागले, तर डेव्हलपर्सची गरज उरेल का? याचे उत्तर ‘हो’ असेच आहे; पण त्यांच्या भूमिकेत मोठा बदल होईल. डेव्हलपर आता केवळ ‘कोड लिहिणारा’ न राहता तो एक आर्किटेक्ट किंवा निरीक्षक बनेल. त्याचे मुख्य काम एआय एजंटस्ना योग्य दिशा देणे, त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासणे आणि उच्चस्तरीय धोरणात्मक निर्णय घेणे हे असेल. सॉफ्टवेअर तयार करणे ही आता टायपिंगपेक्षा समस्या सोडवण्याची कला बनेल.

आर्थिक आणि व्यावसायिक परिणाम

व्यावसायिक द़ृष्टिकोनातून विचार केल्यास एजेंटिक एआयमुळे उत्पादकता कित्येक पटीने वाढणार आहे. कमी खर्चात आणि कमी वेळात अधिक दर्जेदार सॉफ्टवेअर तयार करणे कंपन्यांना शक्य होईल. यामुळे स्टार्टअप्सना मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल. कारण, त्यांना आता मोठ्या टीमशिवाय जटिल सॉफ्टवेअर उत्पादने बाजारात आणता येतील. जगभरातील एजेंटिक एआयची बाजारपेठ येत्या दशकात अब्जावधी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. यावरून या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होते.

डिजिटल कोवर्किंगच्या संदर्भात एजेंटिक एआय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पारंपरिकपणे ‘डिजिटल कोवर्किंग’ म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींनी झूम, स्लॅक किंवा गुगल डॉक्ससारख्या साधनांचा वापर करून एकत्र काम करणे असा होता; मात्र आता या प्रक्रियेत ‘एआय एजंटस्’ एक सक्रिय सदस्य म्हणून सामील झाले आहेत. हे एजंटस् केवळ सहाय्यक नसून ते सहकार्‍याच्या भूमिकेत आहेत. ते बैठकीतील चर्चेचे इतिवृत्त लिहितात, प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतात, तांत्रिक त्रुटी शोधतात आणि प्रसंगी मानवी सहकार्‍यांना महत्त्वाच्या सूचनाही देतात. यामुळे मानवी कर्मचार्‍यांवरील प्रशासकीय कामांचा भार कमी होऊन त्यांना अधिक सर्जनशील आणि धोरणात्मक कामांवर लक्ष केंद्रित करणे शक्य झाले आहे.

आव्हाने आणि धोके

कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे एजेंटिक एआयसमोरही काही आव्हाने आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोडची गुणवत्ता आणि सुरक्षा. एआयने तयार केलेल्या कोडमध्ये काही वेळा अशा चुका असू शकतात, ज्या मानवी डोळ्यांना सहज लक्षात येत नाहीत; पण त्या सुरक्षेच्या द़ृष्टीने घातक ठरू शकतात. तसेच, एआयवर अतिअवलंबित्व वाढल्यामुळे डेव्हलपर्सचे मूलभूत तांत्रिक कौशल्य कमी होण्याची भीतीही व्यक्तकेली जात आहे. डेटा प्रायव्हसी आणि एआयचे नैतिक वापर हेदेखील कळीचे मुद्दे आहेत.

अर्थात, एजंटिक एआय हे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगला नष्ट करण्यासाठी नाही तर त्याला अधिक सक्षम करण्यासाठी आले आहे. जे डेव्हलपर्स या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःला अपडेट करतील, त्यांना भविष्यात मोठी संधी असेल. हे तंत्रज्ञान सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला अधिक सर्जनशील, वेगवान आणि अचूक बनवेल. आपण एका अशा युगाकडे वाटचाल करत आहोत, जिथे मनुष्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील सहकार्य सॉफ्टवेअर विश्वात नवनवीन शिखरे सर करेल. हे केवळ कोडिंगचे भविष्य नाही, तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा एक नवा आविष्कार आहे.

जेपी मॉर्गन चेससारख्या बँका कर्ज मंजुरी, कायदेशीर प्रक्रिया आणि फसवणूक रोखण्यासाठी एआय एजंटस्चा वापर करत आहेत. वॉलमार्ट कंपनी वैयक्तिक खरेदीचा अनुभव देण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवहार खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

हे तंत्रज्ञान विशेषतः गुंतवणूक, रिअल इस्टेट आणि मोठ्या करारांच्या वाटाघाटींमध्ये अत्यंत उपयुक्त ठरते. कारण, ते अफाट डेटाचे विश्लेषण अतिशय वेगाने आणि अचूकपणे करू शकते. मानवी मेंदूला थकवा येऊ शकतो; पण एआय एजंट 24 तास काम करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news